पिंपरी : आर्थिक वर्ष संपण्यास अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिल्याने महापालिकेच्या करसंकलन विभागाने थकबाकीदारांवर कडक कारवाई सुरू केली आहे. जप्तीपूर्व नोटीस बजावूनही कराचा भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या २०० थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत, तर १७ थकबाकीदारांचे नळजोड खंडित करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड शहरात निवासी, औद्योगिक, बिगरनिवासी, मिश्र, मोकळ्या जमीन अशा सहा लाख १५ हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. करसंकलन व करआकारणी विभागाने २०२३-२४ या आर्थिक वर्षात एक हजार कोटी रुपये उत्पन्नाचे लक्ष्य ठेवले आहे. आतापर्यंत ६८० कोटी रुपयांचा कर वसूल केला आहे. आर्थिक वर्ष संपण्यास अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. या कालावधीत जास्तीत जास्त करवसुली करण्यासाठी जप्ती मोहीम, नळजोड खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे.
महापालिकेने एक एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत ३३ हजार २४१ मालमत्ताधारकांना जप्ती नोटिसा पाठविल्या. या मालमत्ताधारकांकडे ५८४ कोटी रुपयांचा कर थकीत आहे. नोटीस देऊनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यास पोलीस बंदोबस्तात सुरुवात करण्यात आली आहे. जप्तीचे नोटीस पथक घराच्या दारात पोहोचल्यानंतर सात हजार ८० जणांनी ७३ कोटी २८ लाखांचा कर भरला आहे, तर २०० मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.
फुगेवाडीतील सर्वाधिक ३८ मालमत्ता जप्त
आकुर्डी विभागात तीन, किवळे ३२, चऱ्होली चार, चिंचवड १४, चिखली १६, थेरगाव १८, दिघी एक, निगडी प्राधिकरण तीन, फुगेवाडीत ३८, भोसरी १६, महापालिका भवन विभागातील सहा, मोशी २९, वाकड सात आणि सांगवी विभागातील १३ अशा २०० मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.
करसंकलन व करआकारणी विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख म्हणाले की, थकबाकीदारांना नोटीस देण्यात आल्या आहेत. नोटीस देऊनही कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. २०० मालमत्ता जप्त केल्या आहेत.