पाण्याच्या टँकरची संख्या वाढवण्याची मागणी
संतश्रेष्ठ तुकोबा आणि माउलींच्या पालखी सोहळ्याच्या मार्गातील सर्व खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेश पिंपरी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांनी सोमवारी एका संयुक्त बैठकीत दिले. महापालिकेने पाण्याच्या टँकरची संख्या वाढवावी, तसेच चुकलेल्या लोकांसाठी पोलिसांनी कक्ष उभारावा, अशी सूचना देहू संस्थानच्या वतीने करण्यात आली.
आषाढवारी पालखी सोहळ्यासाठी सर्व विभागाच्या प्रमुखांची सोमवारी पिंपरी महापालिकेत बैठक झाली. महापौर शकुंतला धराडे, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, सहआयुक्त दिलीप गावडे, सहायक पोलीस आयुक्त मोहन विधाते, पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी. बी. भारणे, वाहतूक पोलीस निरीक्षक बी. मुदीराज, एस. एस. पठाण, देहू संस्थानचे विश्वस्त अशोक मोरे, सुनील मोरे, शांताराम मोरे, रामभाऊ मोरे आदी उपस्थित होते.
महापालिका हद्दीत २८ जून रोजी तुकोबांच्या पालखीचे तर २९ जून रोजी माउलींच्या पालखीचे आगमन होणार आहे. त्यानुसार आवश्यक त्या सर्व गोष्टींचे या बैठकीत नियोजन करण्यात आले. आकुर्डीतील पालखी मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, खासगी शाळांमध्येही वारकऱ्यांची व्यवस्था करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. देहू संस्थानचे मोरे म्हणाले, पालखी सोहळ्याच्या स्वागत व निवासाच्या ठिकाणी वैद्यकीय पथक व रूग्णवाहिकेची व्यवस्था करावी, मोबाईल टॉयलेटची संख्या वाढवावी. सुरेश म्हेत्रे म्हणाले,की सोहळ्याच्या तीन दिवस अगोदर भटक्या जनावरांचा बंदोबस्त करावा, यासारख्या अन्य सूचना बैठकीत करण्यात आल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा