वेगवान विकासाची ग्वाही देणाऱ्या पिंपरी महापालिकेने सभा तहकूब करण्याचा विक्रमही केला आहे. गेल्या तीन वर्षांत तब्बल २८३ सभा तहकूब करण्यात आल्याची माहिती उघड झाली असून या निमित्ताने सभा तहकुबीच्या नाना तऱ्हा, त्यामागील पक्षीय राजकारण आणि संगनमताने होणारे अर्थकारणही पुढे आले आहे.
मनसेचे पालिकेतील गटनेते अनंत कोऱ्हाळे यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नांना उत्तरे देताना पालिका प्रशासनाने ही माहिती दिली आहे. त्यानुसार, गेल्या तीन वर्षांत ९१ पैकी ४० सर्वसाधारण सभा तहकूब झाल्या आहेत. स्थायी समितीच्या २३७ सभांपैकी ८२ सभा तहकूब करण्यात आल्या. विधी समितीच्या १०८ सभांपैकी ५०, महिला बालकल्याण समितीच्या ६६ पैकी १३ आणि शहर सुधारणा समितीच्या १०८ पैकी ५३ सभा तहकूब करण्यात आल्या आहेत. अशाप्रकारे पिंपरी पालिकेतील एकूण ६१० सभांपैकी २८३ सभा तहकूब करण्यात आल्याची लेखी माहिती प्रशासनाने कोऱ्हाळे यांना दिली आहे. ज्या सभेत कोऱ्हाळे यांची प्रश्नोत्तरे होती, ती सभा देखील आबांना श्रध्दांजली वाहण्यासाठी तहकूब करण्यात आली. त्यानंतरच्या सभेत प्रश्नोत्तरेच गुंडाळण्यात आली. पुढील वेळी पाहू, असे आश्वासन देऊन प्रश्नकर्त्यांची बोळवण करण्यात आली.
पिंपरी पालिकेतील सभा तहकूब करताना श्रद्धांजली, गणसंख्या ही कारणे प्राधान्याने दाखवण्यात आली आहेत. एखाद्या घटनेचा, प्रशासनाचा निषेध म्हणूनही सभा तहकूब होतात. एखादा विषय अडवणे, एखाद्याची जिरवणे, पक्षातील गटबाजीचे राजकारण आणि वेळप्रसंगी अर्थकारणाच्या निमित्ताने सभाही तहकूब झाल्या आहेत. सभेचे कामकाज न झाल्यास निर्णय उशिरा होतात, त्यातून नागरिकांची गैरसोय होते. याचा विचार न करता वर्षांनुवर्षे सभा तहकुबीचा खेळखंडोबा सुरूच आहे.

Story img Loader