पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी होणाऱ्या २५ चौकांतील कोंडी सोडविण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पाेलिसांनी उपाययाेजना हाती घेतल्या आहेत. पहिल्या टप्प्यात दहा चाैकांमध्ये वाय जंक्शन संकल्पना, वाहनांसाठी मार्गिका, बाेलार्ड बसविणे, संकेतचिन्हे, रस्ता रेषांकन, दुभाजक, एकेरी वाहतूक, रस्ता रुंदीकरण करण्यात आले. त्यामुळे या चाैकांतील वाहतूक शिस्तबद्ध झाली असून, चाैक काेडींमुक्त झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
पिंपरी-चिंचवड ही उद्योगनगरी असून, येथे अनेक कारखान्यांसह हिंजवडी, तळवडे माहिती तंत्रज्ञाननगरी, नामांकित शाळा, महाविद्यालये आहेत. त्यामुळे वाहनांची संख्याही अधिक असते. बेशिस्त वाहनचालक, रस्त्यालगतच्या अतिक्रमणांमुळे सकाळी व सायंकाळी अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. या कोंडीमुळे वाहनचालकांना मनस्ताप होतो.
ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभाग आणि महापालिकेच्या शहरी दळणवळण विभागाने ८० चाैकांची पाहणी केली. त्यात २५ चौक कोंडीचे आढळले. राज्य शासनाच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमात वाहतूक काेंडीच्या २५ चाैकांपैकी पहिल्या टप्प्यात दहा चाैकांतील काेंडी साेडविण्यासाठी विविध उपाययाेजना केल्या. त्यामध्ये चौकांची नव्याने रचना करण्यात आली. अतिक्रमण हटविले.
वाय-जंक्शनद्वारे सुस्पष्ट रस्ता विभाजन, रस्ते दुरुस्ती, दुभाजक, स्पष्ट रस्ता रेषांकन करून वाहनासांठी मार्गिका, काही चाैकांमध्ये वाहतूक नियंत्रण दिवे (सिग्नल), एकेरी मार्ग, चाैकांमधील सर्कल काढले, रस्ते रुंद केले, पादचारी, सायकलस्वारांसाठी स्वतंत्र मार्गिका करण्यात आल्या. चाैकात वाहतुकीच्या दृष्टीने बाेलार्ड बसविण्यात आले. दिशादर्शक, खबरदारीचे फलक बसविण्यात आले. त्यामुळे चाैकातून वाहनांना निश्चित मार्गाने जावे लागत आहे. परिणामी, वाहतूक शिस्तबद्ध झाली. चाैकात काेंडी हाेत नाही. चौकातील वाहतूक पूर्वीपेक्षा सुकर, विनाअडथळा होत आहे.
काेंडीमुक्त झालेले दहा चाैक
मुकाई चाैक, रावेत अशुद्ध जलउपसा केंद्र, पुनावळे जंक्शन, ताथवडे चौक, वखार महामंडळ चौक, शिवार चौक, स्वराज्य, घरकुल, त्रिवेणीनगर आणि आकुर्डीतील खंडोबा माळ परिसरातील वाय जंक्शन हे दहा चाैक काेंडीमुक्त झाल्याचा महापालिका प्रशासनाचा दावा आहे.
शहरातील दहा चौकांत कोंडी सोडविण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे वाहतूक सुरळीत झाली आहे. चांगले परिणाम दिसून येत आहेत. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील चाकण, म्हाळुंगेतील एचपी, सूस पाषण पूल येथेही उपाययोजना केल्या आहेत. गर्दीच्या वेळी वाहतूक अंमलदाराची नेमणूक केली जात आहे. त्यामुळे चौक पार करण्याची वेळ कमी झाली आहे. बापू बांगर, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड
दहा चाैक काेंडीमुक्त करण्यासाठी सुरुवातीला तात्पुरत्या उपाययाेजना केल्या. त्यानुसार वाहतूक काेंडी सुटते का, याचा अभ्यास केला. त्यानुसार संरचना करून कायमस्वरूपी उपाययाेजना केल्या. त्यामुळे चाैकातील वाहतूक सुरळीत झाली. नागरिकांना वाहतुकीत सुसूत्रता, सुरक्षिततेचा अनुभव मिळत आहे. यामुळे प्रवासाचा वेळ, इंधनाची बचत होत आहे. अपघातांचे प्रमाणही कमी होण्यास मदत होणार आहे. उर्वरित १५ चाैकही लवकरच काेंडीमुक्त करण्यात येणार आहेत. बापूसाहेब गायकवाड, सहशहर अभियंता, शहरी दळणवळण विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका