पिंपरी पालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसने सांगवीतून प्रथमच निवडून आलेल्या नगरसेवक अतुल नानासाहेब शितोळे यांची उमेदवारी मंगळवारी जाहीर केली. विरोधकांकडून अर्ज दाखल न झाल्याने शितोळे यांची बिनविरोध निवड निश्चित असून त्यावर शनिवारी शिक्कामोर्तब होईल. शितोळे-पवार कुटुंबीयांचे नातेसंबंध आणि नानासाहेबांशी वर्षांनुवर्षे असलेल्या स्नेहसंबंधामुळे पवारांनी अतुल शितोळे यांना संधी दिल्याचे मानले जाते.
राष्ट्रवादीचे सर्वच्या सर्व १२ सदस्य अध्यक्षपदासाठी इच्छुक होते. त्यातील वेगवेगळ्या नावांची दिवसभर चर्चा होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत शेवटपर्यंत उत्सुकता ताणली होती. अखेर, पावणेपाचला शितोळेंची उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर, महापौर शकुंतला धराडे, पक्षनेत्या मंगला कदम, शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या उपस्थितीत शितोळेंचा अर्ज नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे दाखल करण्यात आला. अत्यल्प संख्याबळ असल्याने विरोधकांनी अर्ज दाखल केला नाही, त्यामुळे शितोळे यांची बिनविरोध निवड होणार आहे. शनिवारी होणारी निवडणूक केवळ औपचारिकता राहणार आहे. वडिलांमुळेच ही संधी मिळाली व त्यासाठी सर्वानी सहकार्य केल्याचे अतुल शितोळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कोणीही नाराज नसल्याचा दावा करत योगेश बहल व मंगला कदम यांनी नानासाहेबांना ही एक प्रकारची श्रद्धांजली असल्याचे नमूद केले.