पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एका लिपिकाला वैद्यकीय बिलांमध्ये फेरफार करण्याचा ‘उद्योग’ चांगलाच महागात पडला आहे. हे प्रकरण उघड झाल्यानंतर आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी त्यास निलंबित केले असून खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले आहेत.
अरूण अहिवले असे या लिपिकाचे नाव आहे. वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी आलेल्या बिलांच्या रकमेपेक्षा लाखो रूपयांची जादा बिले अदा करण्याचा आरोप अहिवले यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागातील कर्मचारी सुनीता भोसले यांनी एक लाखाचे वैद्यकीय बिल प्रतिपूर्तीसाठी दिले होते. त्याऐवजी चार लाख ११ हजाराचे बिल देण्यात आल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. या पध्दतीने अहिवले यांच्याविषयी आणखी काही तक्रारीही आहेत. कामात दिरंगाई, टाळाटाळ करणे, फाईली गहाळ करणे, वरिष्ठांशी उध्दट बोलणे, परस्पर रजेवर जाणे अशाप्रकारच्या अनेक तक्रारींची दखल घेऊन अहिवले यांना निलंबित करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

Story img Loader