अनधिकृत बांधकामांवरील कारवाईमुळे आयुक्त व सत्तारूढ लोकप्रतिनिधी यांच्यातील संघर्ष अजूनही सुरूच असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. आयुक्त केवळ पाडापाडी करत असून अन्य विकासकामे ठप्प झाली असल्याची लेखी तक्रार राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रशांत शितोळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. न होणाऱ्या कामांकरिता आयुक्त पाठपुरावा करतात. मात्र, होत असलेल्या कामात आडकाठी आणतात, याकडे शितोळे यांनी अजितदादांचे लक्ष वेधले आहे.
डॉ. श्रीकर परदेशी यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासून विकासकामांना खीळ बसली आहे. प्रशासकीय कामात सुधारणा म्हणजेच विकास नाही. आयुक्त पूर्वीचीच कामे पूर्णत्वास नेत असून त्याच कामांचा पाठपुरावा करत आहेत. यंदा उत्पन्नात घट येणार असल्याने प्रत्येक कामात ते आर्थिक कपात करू पाहत आहेत व  नकारार्थी शेरे लिहीत आहेत. यापूर्वीही पालिकेची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. मात्र, कामे खोळंबली नव्हती. मात्र, परदेशींनी प्रभागातील छोटय़ा-छोटय़ा कामांवर टाच आणली आहे. आर्थिक बचतीच्या नावाखाली कामे होऊ न देणे म्हणजे नियोजन नाही. पी. के. दास यांनी मांडलेल्या पर्यटन विकास आराखडय़ाचे श्रेय आयुक्त स्वत:कडे घेत आहेत. त्यांनी काही कामे निश्चितपणे चांगली आहे. मात्र, नागरिकांची व नगरसेवकांच्या अडचणी समजून घेण्याची त्यांची मानसिकता नाही, असे शितोळे यांनी या तक्रारीत म्हटले आहे.

Story img Loader