विलासराव देशमुख सरपंचपदापासून मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचले. मात्र, त्यांना फारसे प्रसिद्ध होता आले नाही. त्या तुलनेत अल्पावधीत एक-दोन ‘हीट’ चित्रपट दिल्यानंतर रितेश देशमुखचे देशभरात, अगदी गल्लीबोळापर्यंत स्वत:चे नाव पोहोचवले, अशी शेरेबाजी िपपरी पालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांनी अभिनेते नाना पाटेकर आणि ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्यासमोरच बुधवारी केली आणि ही शेरेबाजी ऐकून दोघेही अवाक् झाले. नानांनी नंतर त्यांच्या भाषणात आयुक्तांचा तो मुद्दा खोडून विलासरावांची महती सांगितली.
िपपरी पालिकेच्या सहकार्याने चिंचवडला विस्तारित ‘पिफ’चे उद्घाटन नानांच्या हस्ते झाले, तेव्हा लांबलेल्या प्रास्ताविकात आयुक्तांनी ‘रितेश पुराण’ गायले. ते म्हणाले, ‘आपल्यावर चित्रपटांचा प्रभाव असतो. नायक-नायिका होण्याचे स्वप्न विद्यार्थीही पाहतात. चित्रपट, कला, संगीताची सर्वावर भुरळ पडते. त्यामुळे आपल्या समाजात कलाकार, खेळाडू, ‘अॅक्टर-डायरेक्टर’ तत्काळ प्रसिद्ध होतात. राजकारण किंवा नोकरीत कितीही कष्ट करा, इतक्या लवकर नावारूपाला पोहोचता येत नाही. राजकारणात अपार कष्ट करूनही विलासरावांना जे जमले नाही, ते रितेशने करून दाखवले. विलासराव सरपंच होते, आमदार झाले, मंत्री झाले. एक वेळ तर त्यांच्याकडे डझनभर खात्यांचा पदभार होता, त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले आणि बराच काळ टिकलेही. अभिनयाचे क्षेत्र निवडलेला रितेश त्यात यशस्वी झाला.’
देशभरात फिरताना कधी चेन्नईला तर कधी काश्मीरला गेलो. मला विलासरावांचे फोटो कुठेही दिसले नाहीत. मात्र, रितेशचे पोस्टर गल्लीबोळातही झळकलेले पाहिले. विलासराव महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले असतील. देशात त्यांना प्रसिद्ध होता आले नाही, असे आयुक्त म्हणाले.
नानांनी भाषणाच्या सुरुवातीलाच, नटांच्या बाबतीत जितक्या लवकर पोस्टर लागतात, तितक्याच लवकर ती फाडलीही जातात, असे सांगून आयुक्तांचा मुद्दा खोडून काढला. विलासराव नट नव्हते. त्यांचे काम स्थायी आहे व समाजाकडून त्या कामांची दखल कायमच घेतली जाईल, असेही नानांनी ठणकावून सांगितले.
आधीच उशीर त्यात भाषणबाजी
उद्घाटनासाठी सहाची वेळ होती, त्याआधीच नाना तेथे आले. तेव्हा महापौर-आयुक्त जागेवर नव्हते. अध्र्या तासाहून अधिक काळ नानांनी वाट पाहिली. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर आधी सत्कार मग दीपप्रज्वलन झाले. पदाधिकाऱ्यांच्या अनावश्यक भाषणबाजीत दीड तास गेल्याने नानांना ऐकण्यासाठी आलेल्या रसिकांचा हिरमोड झाला. रात्री आठ वाजता नानांना बोलण्याची संधी मिळाली आणि सर्वानी सुटकेचा निश्वास सोडला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा