पिंपरी महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी उद्यान विभागातील अधिकारी व संबंधित ठेकेदारांना चांगलेच फटकारले. ‘बारामती कनेक्शन’ असलेला अधिकारी व  ठेकेदारीत मक्तेदारी असलेल्या एका ठेकेदाराला उद्देशून, सतत ‘बारामती’चे नाव घेऊन मनमानी करू नका, काम चांगले नसल्यास गय करणार नाही, असा सज्जड दम आयुक्तांनी त्यांना भरला.
शहरातील १०० हून अधिक उद्याने तसेच मोठय़ा रस्त्यांच्या सुशोभीकरणाची कामे एकाच ठेकेदाराकडे आहेत, तो बारामतीचा आहे. या विभागातील निर्णयाधिकारी देखील बारामतीकडील आहे. या दोघांचे ‘साटेलोटे’ असल्याचे उघड गुपित आहे. ‘मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर’ अशी त्यांची नेहमीची कार्यपध्दती आहे. त्यांच्या कामाविषयी सतत तक्रारी होत असतात. या चुकांचे खापर आयुक्तांवर फुटू लागल्याने त्या दोघांसह आयुक्तांनी सर्वाचीच खरडपट्टी काढली.
चिंचवडच्या ऑटो क्लस्टर सभागृहात उद्यान विभागातील कामांशी संबंधित अधिकारी व ठेकेदारांची आयुक्तांनी बैठक घेतली. उद्यान, रस्ते दुभाजक, सुशोभीकरण आदी कामांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. तुमचे काम समाधानकारक नसल्याचे सांगून त्यांनी सर्वाना फैलावर घेतले. उद्यान अधिक्षकांचा अधिकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांवर वचक नाही. ठेकेदारांचे काम निकृष्ट आहे, उद्यानांमध्ये घाणीचे साम्राज्य आहे, अनेक ठिकाणी दुर्दशा दिसून येते. ठेकेदारांचे लाड करणार नाही आणि अधिकाऱ्यांची गय करणार नाही. वेळप्रसंगी फौजदारी कारवाई करेन, असा इशाराही देताना मी कोणाला घाबरत नाही, असे सांगण्यास आयुक्त विसरले नाहीत. सारखे-सारखे बारामतीचे नाव घेऊ नका, त्यांच्या नावाखाली मनमानी करू नका, असा दम त्यांनी भरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा