पिंपरी : बदलीची जोरदार चर्चा असतानाच महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी प्रशासनात मोठे बदल केले आहेत. अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप यांच्याकडील काही विभाग सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्याकडे दिले आहेत. पहिल्यांदाच अतिरिक्त आयुक्तांकडील विभाग सह आयुक्तांकडे दिल्याने आयुक्तांविरोधात नाराजीचा सूर दिसून येत आहे. तसेच उपायुक्त, सहायक आयुक्तांच्या कामकाजात सातत्याने बदल केले जात असल्याने अधिकारी खासगीत नाराजी व्यक्त करत आहेत.
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमधील सहा लाख कुटुंबांचे सर्वेक्षण
पिंपरी-चिंचवड महापालिकेत अतिरिक्त आयुक्तांची तीन पदे आहेत. त्यातील दोन अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्तीवरचे आणि महापालिका अधिकाऱ्यांकरिता पदोन्नतीसाठी एक याप्रमाणे तीन पदांची विभागणी करण्यात आली. राज्य सेवेतील प्रतिनियुक्तीवरील प्रदीप जांभळे, विजयकुमार खोराटे आणि स्थानिक उल्हास जगताप असे तीन अतिरिक्त आयुक्त कार्यरत आहेत. आयुक्त सिंह यांनी अतिरिक्त आयुक्त खोराटे यांच्याकडील आकाशचिन्ह व परवाना विभाग, तर जगताप यांच्याकडील आपत्ती व्यवस्थापन, कायदा, कामगार कल्याण विभाग, नागरी सुविधा केंद्राची जबाबदारी काढून सह आयुक्त इंदलकर यांच्याकडे सोपविली आहे. अतिरिक्त आयुक्तांचे अधिकार कमी करून सह आयुक्तांकडे प्रथमच महत्त्वाचे विभाग देण्यात आले आहेत. यापूर्वी सह आयुक्त हे अतिरिक्त आयुक्तांच्या नियंत्रणाखाली काम करत होते.
हेही वाचा…पिंपरी: रावेतमध्ये निवासी शाळेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संचालकासह माजी विद्यार्थिनी अटकेत
शहर अभियंता आणि मुख्य अभियंत्यांच्या कामकाजातही बदल करण्यात आले आहेत. शहर अभियंता मकरंद निकम यांच्याकडे बांधकाम परवानगी, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग, स्थापत्य विभाग आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडील स्थापत्यविषयक कामकाजाचे संपूर्ण नियंत्रण सोपविण्यात आले आहे. मुख्य अभियंता श्रीकांत सवणे यांच्याकडे पाणीपुरवठा, स्थापत्य प्रकल्प, तर मुख्य अभियंता रामदास तांबे यांच्याकडे उद्यान व क्रीडा स्थापत्य, पर्यावरण अभियांत्रिकी, जलनि:सारण विभाग, तसेच झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन स्थापत्य, प्रधानमंत्री आवास योजना विभागाचे नियंत्रण सोपविण्यात आले आहे.
‘वायसीएम’च्या विभागप्रमुखपदी डॉ. अभयचंद्र दादेवार
यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाच्या विभागप्रमुखपदी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्याकडे पदव्युत्तर पदवी संस्थेशी संबंधित शैक्षणिक कामकाजाची जबाबदारी देण्यात आली. वायसीएमचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाने सांगितले.