(

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी : महापालिकेच्या बांधकाम विभागातील सेवा ज्येष्ठतेनुसार पात्र अधिका-यांना डावलून दोन उपअभियंत्यांकडे कार्यकारी अभियंतापदाचा प्रभारी पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे पात्र असूनही कार्यकारी अभियंता पदाचा पदभार देताना डावलल्याने उपअभियंते न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी आयुक्तांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांची सह शहर अभियंता पदावर बढती झाली. बढती झाल्यानंतर काही दिवसातच म्हणजे ३१ मे रोजी राणे सेवानिवृत्त झाले. त्यांच्यानंतर कार्यकारी अभियंता पदावर सेवा ज्येष्ठतेनुसार पात्र अधिका-यांची नियुक्ती होणे अपेक्षित होते. पात्र अधिकारीही होते. मात्र, आयुक्त शेखर सिंह यांनी तसे न करता उप अभियंता सूर्यकांत मोहिते आणि शिवराज वाकडकर यांच्याकडे प्रभारी कार्यकारी अभियंतापदाची जबाबदारी सोपविली.

हेही वाचा >>> पुणे: पोलिसांकडून सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात, मेट्रो स्थानकावर प्रवाशाचा मृत्यू

मोहिते यांच्याकडे महत्वाचा बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग, तर वाडकर यांच्याकडे ‘इ’ क्षेत्रीय स्थापत्य विभागाचा अतिरिक्त पदभार दिला. सर्वच अधिका-यांना बांधकाम विभागात काम करण्यात अधिकचा रस असतो. हा विभाग मिळण्यासाठी अधिका-यांमध्ये स्पर्धा दिसून येते. या विभागावर प्रशासकीय तसेच राजकीय मंडळींचेही बारकाईने लक्ष असते. या विभागात आपल्या मर्जीतील अधिकारी बसविण्यासाठी राजकारणा-यांचे सतत प्रयत्न सुरू असतात. त्यासाठी प्रशासनावार दबावही असतो.

हेही वाचा >>> बीबीए, बीसीए अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत किती संस्थांची नोंदणी?

महापालिकेने १ जानेवारी २०२३ रोजी अंतिम सेवा ज्येष्ठता यादी जाहीर केली होती. त्यानुसार उप अभियंता मोहिते यांच्यापेक्षा १६ तर वाडकर यांच्यापेक्षा २८ उपअभियंते सेवाज्येष्ठ आहेत. असे असताना पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या अधिका-यांना डावलून मोहिते आणि वाडकर यांच्याकडे कार्यकारी अभियंता पदाचा प्रभारी पदभार आयुक्तांनी दिला आहे. त्यामुळे पात्र असूनही कार्यकारी अभियंता पद मिळत नसल्याने संबंधित उप अभियंत्यांनी न्यायालयात जाण्याची तयारी सुरु केली असल्याचे एका अधिका-याने सांगितले. याबाबत आयुक्त शेखर सिंह यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती घेऊन सांगतो असे सांगितले. मात्र, त्यानंतर त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pcmc construction department responsibility on two sub engineers pcmc commissioner decision pune print news ggy 03 zws