उत्पन्नवाढीचे कारण पुढे करून पिंपरी महापालिकेने शहरातील तीनही नाटय़गृहांमधील महत्त्वाच्या तसेच मोक्याच्या तारखांचा लिलाव करण्याचा अजब निर्णय घेतला. मात्र, सर्वच स्तरातून झालेल्या तीव्र विरोधामुळे या निर्णयाला ‘ब्रेक’ लावण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे. तथापि, त्याची अधिकृत घोषणा मात्र करण्यात आलेली नाही.
चिंचवडचे रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर आणि भोसरीतील अंकुशराव लांडगे नाटय़गृह अशी तीन नाटय़गृहे शहरात आहेत. या तीनही ठिकाणी वर्षभरातील महत्त्वाचे दिवस आरक्षित ठेवण्यात येणार होते आणि त्या तारखा मिळवण्यासाठी संबंधित व्यक्ती अथवा संस्थांना जास्तीत जास्त रक्कम द्यावी लागणार होती. ज्याची रक्कम जास्त, त्याला ती तारीख, अशा आशयाचा प्रस्ताव तीन महिन्यांपूर्वी तयार करण्यात आला होता. महापालिकेचे उत्पन्न वाढावे तसेच तारखांमुळे सातत्याने होणारे तंटे बंद व्हावेत, यासाठी हा जालीम उपाय होता. यासंदर्भातील धोरण, दरपत्रक आदी मुद्दय़ांविषयी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू होती. मात्र, या निर्णयाला सांस्कृतिक क्षेत्रातील विविध संस्था, व्यक्तींनी तीव्र विरोध दर्शवला. सांस्कृतिक चळवळ वाढली पाहिजे, अशी भाषा करणाऱ्या तसेच सांस्कृतिकदृष्टय़ा पोषक वातावरणासाठी सांस्कृतिक धोरण राबवण्याच्या तयारीत असणाऱ्या महापालिकेने कार्यक्रमांसाठी तारखांचा बाजार मांडायचे ठरवल्याने चहुबाजूने टीका होऊ लागली. तशा तक्रारी आयुक्तांकडे करण्यात आल्या. त्यामुळे या विषयाचे पुढे काहीच झाले नाही. आजमितीला लिलावाचा प्रस्ताव स्थगित केल्याचे दिसते आहे. तथापि, त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा