काँग्रेस, राष्ट्रवादीने गेल्या २० वर्षांत काहीच केले नाही, असे सांगून भारतीय जनता पक्षाच्या हातात सत्ता द्या, शहराचा कायापालट करू, अशी ग्वाही पुण्याचे पालकमंत्री  गिरीश बापट यांनी पिंपरीत पत्रकार परिषदेत बोलताना दिली. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या आमदार महेश लांडगे यांनी स्वतंत्र ‘निर्धारनामा’ प्रसिद्ध केल्याने सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत. तथापि, विकेंद्रीकरणाची भूमिका ठेवून केवळ विधानसभाच नव्हे तर प्रभागनिहाय स्वतंत्र जाहीरनामे काढण्याची पक्षाची भूमिका असल्याची सारवासारव बापट यांनी केली.‘हजारो कोटी रूपयांची भ्रष्टाचाराची मालिका खंडित करू या आणि बहुमताने कमळ फुलवूया’ असे आवाहन करणारा भाजपचा वचननामा बापट यांच्या हस्ते जाहीर करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, अ‍ॅड. सचिन पटवर्धन, सदाशिव खाडे, बाबू नायर, प्रमोद निसळ आदी उपस्थित होते. तथापि, आमदार लांडगे गैरहजर राहिले. िपपरी भाजपचा वचननामा दिशादर्शक असून पाच वर्षांत त्याची दृश्यं अंमलबजावणी केली जाईल, असे सांगून बापट म्हणाले,की भाजपने जात-पात पाहून उमेदवार दिले नसून निवडून येण्याच्या शक्यतेसह अन्य मुद्दय़ांचा विचार झाला आहे.

पक्षात गटतट नाही. अंतर्गत समस्या असल्यास ती निपटून काढण्यास पक्ष समर्थ आहे. पुणे-िपपरीत सामूहिक नेतृत्व आहे. एकत्र बसून निर्णय घेतो. खासदार संजय काकडे यांच्याशी कसलेही मतभेद किंवा स्पर्धा नाही. शिवसेनेने युती तोडली, आम्ही नाही. विधानसभेप्रमाणे स्वतंत्र लढू, प्रत्येकाला स्वत:ची ताकद कळेल. महापालिकांची हद्दवाढ करताना शहर किती मोठे करावे, याच्या मर्यादाही लक्षात घ्यायला हव्यात, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

मध्यावधी निवडणुकांविषयी शरद पवार यांनी केलेले भाकीत चुकीचे आहे, सरकार कार्यकाल पूर्ण करेल. निवडणुकाच काय, कोणत्याही गोष्टींना सामोरे जाण्यासाठी सरकार तयार आहे. अजित पवारांनी पीएमपीची स्थापना केली आणि त्यांनीच कंपनीची वाट लावली. उद्धव ठाकरे प्रचार सभांमध्ये जी भाषा वापरत आहेत, ती चुकीची आहे. जनता योग्य ते उत्तर मतपेटीतून देईल. त्यांची संपत्ती जाहीर व्हावी, या मागणीत गैर काय आहे? देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेची ‘औकात’ काढली नाही. मुख्यमंत्र्यांनी ‘क्षमता’ या अर्थाने तो शब्द वापरला. राज ठाकरे यांना मनसेपेक्षा भाजपचीच जास्त काळजी आहे. भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही, हे छगन भुजबळ यांच्या माध्यमातून दिसून आले. मात्र, आम्ही सूडबुद्धीने वागणार नाही. – गिरीश बापट

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pcmc elections girish bapat bjp pcmc manifesto