अग्निशमन दलात मर्यादित साधने, अपुरे मनुष्यबळ, कार्यक्षम अधिकाऱ्यांची वानवा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वेगाने विकसित होत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात वर्षभरात आग व तत्सम विविध कारणांसाठी अग्निशामक दलाकडे तब्बल एक हजार वर्दी येत आहेत आणि गेली तीन वर्षे हे प्रमाण कायम राहिले आहे. यापुढील काळात हे प्रमाण आणखी वाढत जाण्याची शक्यता आहे. मर्यादित साधने, अपुरे मनुष्यबळ, कार्यक्षम अधिकारी व कुशल कर्मचाऱ्यांची वानवा यासारख्या कारणांमुळे या विभागाच्या मर्यादा वेळोवेळी स्पष्ट झाल्या आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील पराकोटीच्या वादामुळे या विभागाचे ‘तीन तेरा’ वाजले असून कोणाचेही नियंत्रण नसल्याने काही चांगल्या सुधारणा होण्याची शक्यता कमीच असल्याचे सांगण्यात येते.

अग्निशमन तसेच अग्नी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, जीवित व वित्त हानी वाचवणे, आपत्तीकालीन व्यवस्थापन करणे, विविध प्रकारचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देणे, अग्निशमन यंत्रणा सुसज्ज ठेवणे, २४ तास सेवा पुरवणे ही पालिकेच्या अग्निशामक दलाची महत्त्वपूर्ण कामे आहेत. शहराची लोकसंख्या आजमितीला २२ लाख लोकसंख्या आहे. एक मुख्य अधिकारी, आठ अन्य अधिकारी आणि १२४ कर्मचारी अशा मर्यादित संख्येच्या जोरावर या विभागाचा गाडा ओढण्याचे काम सुरू आहे. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे या विभागासमोर अनेक अडचणी उद्भवतात. अलीकडे, आग विझवण्यापुरते मर्यादित काम या विभागाला राहिले नाही. पतंगांच्या मांजात अडकल्याने पक्षी जखमी होण्याचे प्रमाण वाढले असून अग्निशामक दलासाठी ती डोकेदुखी ठरली आहे. पाण्यात बुडणाऱ्या किंवा वाहून जाणाऱ्या व्यक्ती, उंचावर अथवा खोलगट ठिकाणी अडकलेली व्यक्ती, झाड पडलेल्या ठिकाणी, लिफ्टमध्ये किंवा चेंबरमध्ये अडकलेली माणसे काढण्याचे कामही अग्निशामक कर्मचाऱ्यांना करावे लागते. सर्व मिळून वर्षभरात हजाराच्या घरात वर्दीची संख्या जाते.

अग्निशामक दलाकडे मर्यादित स्वरूपाची साधने आहेत. आधुनिक वाहनांसाठी कुशल कर्मचारी उपलब्ध नाहीत. कार्यक्षम अधिकारी लाभले नाहीत, हे या विभागाचे नाजूक दुखणे आहे. जे अधिकारी कार्यरत आहेत, त्यांच्यात कमालीचे वाद आहेत. या विभागाची धुरा ज्यांच्याकडे आहे, त्यांचा एककल्ली कारभार हे त्यांचे वैशिष्टय़ आहे. त्यांच्या कार्यपद्धतीविषयी बऱ्याच तक्रारी आहेत. अधिकाऱ्यांचे कुरघोडीचे राजकारण या विभागाला लागलेला शाप आहे. अधिकाऱ्यांच्या वादामुळे कर्मचाऱ्यांच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम झाल्याची अनेक उदाहरणे दिली जातात. अलीकडेच, मोशी कचरा डेपोला आग लागल्यानंतर या विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दाखवलेला बेजबाबदारपणा सर्वाच्या चर्चेचा विषय बनला आहे. वैद्यकीय कारण पुढे करून निघून गेलेला हा अधिकारी नंतर कामावर हजर झालाच नाही ;अशी प्रातिनिधिक अनेक उदाहरणे आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pcmc fire brigade