पिंपरी-चिंचवड शहरातील ज्या मोकळ्या भूखंडांवर कचराकुंडय़ा तयार झाल्या आहेत, त्यांची येत्या ३१ मेपर्यंत स्वच्छता करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी बुधवारी दिले. या जागांवरील प्लास्टिक व अन्य राडोराडा दर तीन महिन्यांनी स्वच्छ झाला पाहिजे, अशी तंबीही त्यांनी दिली.
चिंचवड येथील अ‍ॅटो क्लस्टर सभागृहात महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत आयुक्तांनी शहरातील स्वच्छतेच्या कामाचा आढावा घेतला. सहआयुक्त पांडुरंग झुरे, सहायक आयुक्त डॉ. उदय टेकाळे, दिलीप गावडे, ज्ञानेश्वर ढेरे, सुभाष माढरे आदींसह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते. ‘पिंपरीतील मोकळ्या हजार भूखंडांवर कचराकुंडय़ा’ या शीर्षकाखाली लोकसत्ताने मंगळवारी ठळकपणे प्रसिद्ध केलेल्या बातमीचा संदर्भ आयुक्तांनी बैठकीत दिला. चांगल्या कामाचे प्रसारमाध्यमांकडून कौतुक होते. तर, चुकीची कामे झाल्यास ते झोडपून काढतात, अशी टिप्पणीही त्यांनी या वेळी केली. शहरातील हजारहून अधिक मोकळ्या भूखंडांवर कचराकुंडय़ा झाल्या आहेत, त्याकडे विशेष लक्ष द्या, त्या भूखंडावर दर तीन महिन्यांनी स्वच्छता करा, मनुष्यबळ व यंत्रणा आहे, त्याचा वापर करा, अशा सूचना आयुक्तांनी  केल्या. आयुक्त म्हणाले, आपण शहराचे प्रथम नागरिक व त्यानंतर अधिकारी किंवा कर्मचारी आहोत. कर्तव्य व जबाबदारीचे भान ठेवून तुमच्या गावासाठी म्हणून तरी चांगल्या दर्जाचे काम करा. शहरातील सर्व मोकळे भूखंड ३१ मेपर्यंत स्वच्छ झाले पाहिजेत. दर तीन महिन्यांनंतर नियमितपणे त्यांची स्वच्छता कायम राखण्यात यावी. त्यासाठी मुकादम ते विभागप्रमुख अशा कामांचा तक्ता तयार करण्याची सूचना आयुक्तांनी दिली.
धोकादायक इमारतींचे सव्‍‌र्हेक्षण
पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील धोकादायक इमारतींचे सव्‍‌र्हेक्षण करून संबंधित मालकांना नोटीस बजावण्याचे आदेश आयुक्त राजीव जाधव यांनी या बैठकीत दिले. शहरात ठिकठिकाणी पडलेला राडारोडा उचलण्यात यावा, पाच जूनपर्यंत नालेसफाईची कामे पूर्ण करावीत, असेही ते म्हणाले.

Story img Loader