पिंपरी : शहरातील १८ मीटरपेक्षा जास्त रूंदी असलेल्या रस्त्यांची सफाई यांत्रिकी पद्धतीने करताना किलोमीटर वाढवण्यासाठी रस्ता साफ न करताच रस्ते सफाई वाहन (रोडस्वीपर) पळविणाऱ्या ठेकेदारांना आता चाप बसणार आहे. महापालिकेच्या आराेग्य विभागाने ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) यंत्रणेत बदल करत सफाई वाहनावर ऑनलाइन लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.
महापालिकेमार्फत शहरातील १८ मीटर रूंदीचे रस्ते यांत्रिकी पद्धतीने साफ केले जातात. शहराचे दक्षिण आणि उत्तर असे दोन भाग केले आहेत. फेब्रुवारी २०२४ पासून यांत्रिकी पद्धतीने चार विभागात काम सुरू असून, यासाठी चार संस्था कार्यरत आहेत. प्रत्येक विभागात दोन मोठी, दोन मध्यम रस्ते सफाई वाहने, दोन हायवा, एक पाण्याचा टँकर अशा वाहनांचा समावेश आहे. या वाहनांचे संचलन करण्यासाठी प्रत्येक विभागात ३२ सफाई कर्मचारी, नऊ वाहनचालक, दहा ऑपरेटर, चार मदतनीस असे ५५ कामगारांद्वारे कामकाज करणे अपेक्षित आहे. प्रत्येक रस्ते सफाई वाहनद्वारे दररोज ४० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची साफसफाई करणे आवश्यक आहे.
हेही वाचा >>> पिंपरीतील ११२२ जणांचे पिस्तूल पोलिसांकडे जमा
१८ मीटर व त्यापेक्षा जास्त रुंदीचे रस्ते, बीआरटीएस, महामार्गावरील पदपथ आणि सेवा रस्त्याच्या दोन्ही बाजुंची आठवड्यातून तीन वेळा, मुख्य मार्गावरील मधल्या रस्त्याची, रस्त्याच्या कडेच्या भिंतीच्या परिसराची आठवड्यातून एकवेळा सफाई करणे बंंधनकारक आहे. किलोमीटर वाढवण्यासाठी रस्ता साफ न करताच रस्ते सफाई वाहन ठेकेदारांनी पळविल्याचे समोर आले होते. त्यानंतर महापालिकेने अँन्थाेनी वेस्ट हॅण्डलिंग सेल लिमिटेडला पाच, लायन सर्व्हिसेला चार, रिल वेस्ट मॅनेजमेंट एलएलपीला तीन तर भूमिका ट्रान्स्पाेर्टला दाेन नाेटिसा बजाविल्या. तर, लायन सर्व्हिसेसला ५० हजार रुपयांचा दंडही ठाेठावला हाेता.
हेही वाचा >>> पुणे: ऐन दिवाळीत गोळीबाराची अफवा, अल्पवयीनाकडून नियंत्रण कक्षाला दूरध्वनी
यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाई करताना ठेकेदार सफाई वाहनाच्या ब्रशचा वापर करत नव्हते. त्यामुळे ब्रशचा वापर हाेताे की नाही, याची पाहणी करण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणेत बदल करण्यात आला आहे. याचीही माहिती महापालिकेत बसून हाेणार आहे.
रस्ते सफाई करताना ठेकेदार सफाई वाहनाच्या ब्रशचा वापर न करता किलाेमीटर वाढविण्यासाठी पळवत हाेते. ही बाब निदर्शनास आली. त्यामुळे रस्ते सफाई वाहनांवर ऑनलाइन लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार यंत्रणेत तसा बदल केला असल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आराेग्य विभागाचे सहायक आयुक्त अजिंक्य येळे यांनी सांगितले.