पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांचा सुळसुळाट, ही वर्षांनुवर्षे चालत आलेली गंभीर समस्या आहे. या संदर्भात, सातत्याने नुसत्याच घोषणा झाल्या. मात्र, अपेक्षित कार्यवाही झालीच नाही. आता महापालिका प्रशासनाने उशिरा का होईना, नव्याने काहीतरी ‘ठोस’ करायचे आहे, असे दाखवत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नागरिकांनी आपल्या आजूबाजूला अनधिकृत जाहिराती, फलक तसेच होर्िडग असल्यास तक्रार करावी, त्यासाठी पालिकेने मोफत टोल फ्री क्रमांक तसेच ‘एसएमएस’ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
शहरातील सर्वप्रकारच्या अनधिकृत जाहिराती तसेच होर्डिगविषयक तक्रार करण्यासाठी महापालिकेने १८००२३३०६६६ हा मोफत टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर, ९९२२५०१४५० या मोबाइल दूरध्वनी क्रमांकावर एसएमएसद्वारे तक्रार करता येणार आहे. या दोन्ही सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा आणि अनधिकृत फलकांविषयी पालिकेकडे तक्रारी कराव्यात, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांनी केले असून योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील जवळपास सर्वच प्रमुख चौकांमध्ये तसेच अंतर्गत भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात अनधिकृत फलक आढळून येतात. राजकीय पक्ष तसेच विविध संस्था, संघटनांचा त्यामध्ये समावेश आहे. सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसच्या फलकांची संख्या तुलनेने अधिक असते. या सर्व फलकांवर कारवाई करण्यास पालिका प्रशासनाकडून टाळाटाळ केली जाते. तथापि, पालिकेने टोल फ्री व एसएमएसद्वारे तक्रारी मागवून नव्याने प्रयत्न केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा