पिंपरी महापालिकेच्या वतीने आजी-माजी नगरसेवक, शिक्षण मंडळ सदस्य तसेच स्वीकृत सदस्य मिळून १५० जणांचा विमा उतरवण्यात येणार आहे. प्रारंभी निश्चित करण्यात आलेली विम्याची १० लाखांची रक्कम आता पाच लाख इतकीच ठेवण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी सभेत मांडण्यात आला आहे. माजी नगरसेवकांच्या बाबतीत धोरण काय असावे, याविषयी पालिकेने राज्य शासनाकडून मार्गदर्शन मागवले होते. तथापि, अजूनही शासनाकडून पालिकेला उत्तर मिळालेले नाही.
पिंपरी पालिकेच्या १९ ऑगस्ट २०१४ च्या सभेत सदस्य व त्यांचे कुटुंबीय यांच्याकरिता १० लाख रकमेचा आरोग्य विमा उतरवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर, आयुक्तांनी कायदा विभाग व मुख्य लेखापरीक्षकांचे अभिप्राय मागवले. या संदर्भात स्पष्ट तरतूद नसल्याने व माजी नगरसेवकांबाबत काही धोरण नसल्याने शासनाकडून माहिती मागवण्याचे ठरले. त्यानुसार, एका पत्राद्वारे शासनाकडे विचारणा करण्यात आली. मात्र, नगरविकास विभागाकडून अद्यापपर्यंत पालिकेला मार्गदर्शन मिळालेले नाही. तीन एप्रिल २०१५ ला आयुक्तांच्या उपस्थितीत एका बैठक झाली, त्यात १० लाखांऐवजी पाच लाख रुपये विमा उतरवण्याचा निर्णय झाला. या योजनेत शिक्षण मंडळ सदस्य व स्वीकृत सदस्यांचाही समावेश करण्यात आला. पाच लाखांच्या विम्यासाठी १५० सदस्यांकरिता १५ लाखांचा हप्ता अपेक्षित धरण्यात आला आहे, त्यातील १० टक्के रक्कम संबंधित सदस्याने तर उर्वरित ९० टक्के रक्कम महापालिका भरणार आहे. तर, माजी नगरसेवकांसाठी हप्त्याचा २५ टक्के हिस्सा संबंधित सदस्यामार्फत व ७५ टक्के हिस्सा पालिकेकडून दिला जाणार आहे.

Story img Loader