पिंपरी: शहवासीयांना निवासस्थानापासून जवळचे मेट्रो, बसस्थानक, शाळा, महाविद्यालये, बँका आदी ठिकाणी कामानिमित्त पायी जाणे सहज शक्य व्हावे, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका ‘हरित सेतू’ प्रकल्प राबविणार आहे. त्यासाठी देशातील अनुभवी तज्ज्ञांचे सहकार्य घेतले जाणार असल्याची माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
देशभरातील स्मार्ट सिटीची दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा निगडी येथे झाली. अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, शहर अभियंता मकरंद निकम, सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे, उपआयुक्त मनोज लोणकर या वेळी उपस्थित होते.
शहरातील रस्त्यांच्या सौंदर्यीकरणाच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरी सहभाग आणि नावीन्यता यांचा योग्य मेळ घालणे आवश्यक आहे. सार्वजनिक परिसर पादचाऱ्यांसाठी, लहान मुलांसाठी आणि रहिवाशांसाठी उत्साहवर्धक बनवण्याचा महापालिकेचा उद्देश आहे. त्यासाठी देशातील अनुभवी तज्ज्ञांच्या सहकार्याने हरित सेतू नावाचा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.
हेही वाचा… मार्केट यार्ड परिसरात आंबेडकरनगर झोपडपट्टीत मोठी आग
नागरिकांमध्ये पायी चालणे, सायकल चालविणे आणि धावणे या दैनंदिन आरोग्यदायी सवयींचे महत्त्व रुजविण्यासाठी, तसेच त्यांना प्रोत्साहित करून शहरांमधील उपलब्ध सार्वजनिक पायाभूत सुविधांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध पैलूंवर काम करण्यात येत आहे. त्यामध्ये रस्त्यांचा आणि सार्वजनिक परिसरांचा विकास होणे गरजेचे असून, या कार्यशाळेच्या माध्यमातून हे ध्येय साध्य होण्यास नक्कीच मदत मिळेल. हरित सेतूची शाश्वत अंमलबजावणी करण्यासाठी कर्जरोखे (ग्रीन बॉण्ड) उभारण्यात येणार असल्याचे आयुक्त सिंह यांनी सांगितले.
विनाअडथळा पदपथावरून…
हरित सेतू प्रकल्पाद्वारे विकसित केलेल्या पदपथावर अतिक्रमण करण्यास प्रतिबंध घातला जाणार आहे. त्या ठिकाणी झाडे असणार आहेत. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले यांना उन्हाळ्यात पदपथावरून चालताना सावलीचा आधार घेता येणार आहे. अतिक्रमण प्रतिबंधित असल्यामुळे नागरिकांना विनाअडथळा पदपथावरून चालता येणार आहे.