पिंपरी : शहरातील हॉटेल, रुग्णालय, तसेच, शाळा आणि शैक्षणिक संस्थांकडे मालमत्ताकराची पाच कोटी चार लाख रुपये थकबाकी आहे. या मालमत्ताधारकांना महापालिकेच्या करसंकलन विभागाने जप्तीपूर्व नोटीस बजावल्या आहेत. आता या मालमत्ता लाखबंद (सील) करून जप्त करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाने एक लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या बिगरनिवासी व निवासी मालमत्ता लाखबंद करून जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे. १ एप्रिल २०२४ ते २२ जानेवारी २०२५ या कालावधीत १८ विभागीय कार्यालयांकडून ६४२ कोटी १८ लाखांची वसुली करण्यात आली आहे. या कार्यालयांना ३१ मार्च २०२५ पर्यंत एक हजार २५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. दोन महिन्यांत करसंकलन विभागास ६०० कोटी रुपयांची वसुली करण्याचे आव्हान असणार आहे.
शहरातील २१ नामांकित शाळांकडे एक कोटी ८७ लाखांची थकबाकी आहे. त्यांपैकी नऊ शाळा लाखबंद केल्या आहेत. शाळा लाखबंद करताच थकबाकी भरल्यामुळे तीन शाळांवरील कारवाई मागे घेण्यात आली. तर, १३ लहान-माेठ्या रुग्णालयांकडे एक कोटी ३७ लाखांची थकबाकी आहे. रुग्णालयचालकांना महापालिकेने जप्तीपूर्व नोटीस बजाविली आहे.
शहरातील विविध भागांतील ३५ राजकीय पुढाऱ्यांसह उद्योजकांच्या हॉटेल, बारकडे एक कोटी ८० लाख रुपयांची थकबाकी आहे. या व्यावसायिकांना नोटीस देण्यात आली असून, कर न भरल्यास हाॅटेल लाखबंद केले जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या बिगरनिवासी मालमत्ता लाखबंद करून जप्तीची कारवाई तीव्र करण्यात आली आहे. नोटीस बजावूनही प्रतिसाद न देणाऱ्या मालमत्ता जप्त करण्यात येत आहेत. मुदतीमध्ये थकबाकी न भरल्यास त्या मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. संपूर्ण थकबाकी भरल्याशिवाय लाखबंदची कारवाई मागे घेण्यात येत नाही, असे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.