राष्ट्रवादीची पिंपरी महापालिकेत निर्विवाद सत्ता मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे आमदार लक्ष्मण जगताप आता भाजपवासी झाले आहेत. जगतापांनी पक्षांतर केल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पराभवासाठी जोरदार फिल्डींग लावली. मात्र, तरीही मोठय़ा मताधिक्याने विजयी झालेल्या जगतापांनी महापालिकेच्या २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपचीच सत्ता असेल, असा निर्धार व्यक्त करून अजितदादांशी दोन हात करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
चिंचवड ग्रामस्थांच्या वतीने वाल्हेकरवाडीत जगतापांचा सत्कार झाला, तेव्हा ते बोलत होते. माजी नगरसेवक तानाजी वाल्हेकर, राजेंद्र साळुंके, कांता मोंढे, सुभाष चिंचवडे, नामदेव ढाके, मोरेश्वर शेडगे, तात्या आहेर आदी उपस्थित होते. पिंपरीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. जगताप राष्ट्रवादीत होते, तेव्हा जवळपास २५ नगरसेवक त्यांनी निवडून आणले. विधानसभेच्या उमेदवारीसाठी ते भाजपमध्ये गेले. सव्वा दोन वर्षांनंतर पालिकेच्या निवडणुका होत आहेत. या पाश्र्वभूमीवर जगताप म्हणाले, सत्कारातून प्रेरणा मिळते व प्रेरणेतून इतिहास घडतो. २०१७ मध्ये पिंपरीत वेगळा इतिहास घडवू, तिथे भाजपची सत्ता आणू. कार्यकर्त्यांची लढाई संपली असून आता आपली लढाई सुरू झाली आहे. यादीप्रमुख व केंद्रप्रमुख जागृत राहिल्यास सत्ता आणणे अवघड नाही. आतापर्यंत जे सत्तेपासून वंचित राहिले, त्यांना सत्तेपर्यंत पोहोचवू. भाजपमध्ये कौटुंबिक संस्कृती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी ताकद निर्माण केली आहे. त्या जीवावर पिंपरीत सत्ता आणू आणि खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट सिटी’ आणि पारदर्शक कारभार कसा असतो, ते दाखवून देऊ, असे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा