‘मी कोणाच्याही तालावर नाचत नाही’
पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे यांच्यावर त्यांच्याच पक्षाच्या नेत्या मंगला कदम आणि माजी महापौर योगेश बहल यांचा ‘रिमोट कंट्रोल’ चालतो, हे उघड गुपित आहे. नेमके याच मुद्दय़ावरून शुक्रवारी पिंपरी पालिका सभेत चांगला गोंधळ झाला. आकृतीबंधाच्या विषयावर बोलू न दिल्याने संतापलेल्या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेविका शमीम पठाण यांनी, ‘महापौर, तुम्ही कोणाच्या तालावर नाचता आहात’, असा सवाल केल्यानंतर महापौर संतापल्या. ‘मी कोणाच्याही तालावर नाचत नाही आणि तशी मला गरजही नाही’, असे ठणकावून सांगितले. यावरून झालेल्या गोंधळातच सभा महिनाभरासाठी तहकूब करण्यात आली.
मागील सभेत महिनाभरासाठी तहकूब ठेवलेला नव्या आकृतीबंधाचा विषय शुक्रवारी सभेपुढे पुन्हा चर्चेसाठी आला, तेव्हा पठाण यांना त्यावर बोलायचे होते. तथापि, महापौरांनी हा विषय मंजूर केल्याचे जाहीर केले, त्यामुळे पठाण चिडल्या. सभेत नेहमीच होणाऱ्या एकतर्फी कारभाराच्या विरोधात पठाण सातत्याने आवाज उठवत आल्या आहेत. शुक्रवारी तोच प्रकार स्वत:च्या बाबतीत घडल्याने संतापलेल्या पठाण यांनी, ‘महापौर, तुम्ही कोणाच्या तालावर नाचता आहात, असे विधान कदम व बहल यांना उद्देशून केले. पठाण यांच्या विधानामुळे संतापलेल्या महापौरांनी, ‘तुम्ही नीट शब्द वापरा, हे काय थिएटर आहे का, कोणाच्या इशाऱ्यावर नाचण्याची मला गरज नाही. तुम्ही पक्षाच्या बैठकीत (पार्टी मिटिंग) काही बोलत नाही आणि सभेत कांगावा का करता, असे उत्तर दिले. यावरून सभेत गोंधळ झाला. चंद्रकांता सोनकांबळे यांनी, नाचणे हा शब्द मागे घ्या, अशी भूमिका मांडली. त्यानंतर, मंजूर म्हणून जाहीर केलेल्या आधीच्याच विषयावर महापौरांनी पुन्हा चर्चा सुरू करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा वैतागलेल्या बहल यांनी महापौरांना थांबवले. आता काय करायचे, असे महापौरांनी बहल यांना विचारले. सभा तहकूब करण्याची सूचना बहल यांनी महापौरांना केली. त्यानंतर, मंगला कदम यांच्या सूचनेनुसार, महापौरांनी २० जूनपर्यंत सभा तहकूब केल्याचे जाहीर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा