पिंपरी-चिंचवडच्या महापौर मोहिनी लांडे यांचा वर्षभराचा कालावधी पूर्ण झाला असून अडीच वर्षांची महापौरपदाची मुदत पूर्ण करण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. महापौरासाठी वर्षभराचा वेळ पुरत नाही. सत्कारात व काम समजून घेण्यातच वेळ निघून जातो. त्यामुळे नेत्यांनी आदेश दिला, तर यापुढेही महापौर म्हणून काम करू, अशी इच्छा व्यक्त करतानाच मर्यादित अधिकारांमुळे महापौरपद शोभेचे झाले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
महापौर मोहिनी लांडे यांनी पत्रकार परिषदेत आपल्या वर्षपूर्तीचा आढावा घेतला. नगरसेवक अजित गव्हाणे, शिक्षण मंडळ सदस्य निवृत्ती शिंदे आदी उपस्थित होते. महापौरपदासाठी अडीच वर्षांचे आरक्षण असून सव्वा वर्षांचे दोन महापौर करण्याची राष्ट्रवादीत प्रथा आहे. यापूर्वीचे महापौर योगेश बहल यांनी सलग अडीच वर्षे महापौरपद भूषविले व सव्वा वर्षांच्या महापौराची प्रथा खंडित झाली. आता लांडे यांनीही अडीच वर्ष पदावर राहण्याचा मानस व्यक्त केला. मात्र नेतेच अंतिम निर्णय घेतील, असेही स्पष्ट केले आहे.
पक्षाध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आमदार, सर्वपक्षीय स्थानिक नेते व नगरसेवकांचे सहकार्य मिळाले. वर्षभरात सात हजार कार्यक्रमांना हजेरी लावली. युवती सुरक्षा अभियान राबवले व महिलांसाठी प्राधान्याने काम केले, महापौर निधीतून ५५० जणांना मदत केली. आंदरा धरणातून शहरासाठी पाणी आणणाऱ्या प्रकल्पाने अपेक्षित प्रगती साधली नाही. अनधिकृत बांधकामांचा प्रश्न आता सुटणार असून याबाबतचा अध्यादेश लवकरच निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याशिवाय, मेट्रो, सायन्स पार्क, नवीन गावांसाठी तरतूद, क्रीडा धोरण, पर्यावरण विकास आराखडा, रेडझोन, आरोग्य सुविधा, अभय योजना, प्रदूषणमुक्त शहर आदींचा पाठपुरावा केल्याचे महापौरांनी सांगितले.
 महापौर म्हणतात, आयुक्तांशी संघर्ष नाही!
आयुक्त व महापौर ही रथाची दोन चाके आहेत. त्यांच्यात वाद असून चालणार नाही. नागरिकांचे प्रश्न सुटणे महत्त्वाचे आहे. आयुक्त त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत. काही बाबतीत मतभेद असतील. मात्र, आयुक्तांशी कसलाही संघर्ष नाही, असे महापौरांनी स्पष्ट केले आहे.