केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’साठी आवश्यक पात्रता व अन्य सर्व गोष्टीत बसत असताना तसेच खुद्द मुख्यमंत्र्यांनी समावेशाची ग्वाही दिली असतानाही पिंपरी-चिंचवडला डावलण्यात आले, ही बाब पिंपरीकरांच्या दृष्टीने धक्कादायक व दुर्दैवी आहे, अशी खंत पिंपरीच्या महापौर शकुंतला धराडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
केंद्र व राज्य शासनाने ‘स्मार्ट सिटी’साठी ठरवलेल्या सर्व निकषांमध्ये शहर बसत होते. सहभागी शहरांमध्ये १०० गुणांची स्पर्धा झाली, त्यातही ९२.५ टक्के गुण मिळाले होते आणि पहिल्या पाच शहरांमध्ये पिंपरीचा समावेश आहे, अशी ग्वाही खुद्द मुख्यमंत्र्यांनीच शिष्टमंडळाशी बोलताना दिली होती. तरीही असा निर्णय झाला, हे आश्चर्य आहे. अन्य शहरांच्या तुलनेत पिंपरीची आर्थिक परिस्थिती सक्षम आहे. नेहरू अभियानातील प्रकल्पांची तसेच महापालिकेच्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामांचा मोठा अनुभव पिंपरीला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात ४५ किलोमीटर लांबीचा बीआरटी कॉरीडॉर उभा आहे. कदाचित असे राज्यातील पहिले शहर असावे. तीनच वर्षांपूर्वी शहरविकासाची नोंद घेऊन ‘बेस्ट सिटी’ म्हणून गौरविण्यात आलेल्या पिंपरीला ‘स्मार्ट सिटी’तून बाहेर काढण्यात आले, ही बाब शहरवासीयांच्या दृष्टीने धक्कादायक व दुर्दैवी आहे. ‘स्मार्ट सिटी’त समावेश न झाल्यास पिंपरीच्या विकासकामांवर परिणाम होईल, अशी धास्ती व्यक्त करून हा अन्याय मुख्यमंत्र्यांनी दूर करावा, अशी मागणी महापौरांनी या पत्राद्वारे केली आहे.

Story img Loader