पिंपरी महापालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी नेमलेल्या दोन सल्लागारांना शुल्क म्हणून देण्यात आलेली २२ कोटी रुपये रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्यात यावी, अशी मागणी मनसेने आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे केली आहे. या सल्लागारांनी चुकीचे सल्ले दिले, त्यांच्यावरील जबाबदारी व्यवस्थित पार पाडली नाही, प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकला नाही, सात वर्षे रखडला, त्यास त्यांचे सल्ले कारणीभूत आहेत, असे मनसेने म्हटले आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत निगडीतील सेक्टर २२, अंजठानगर, मिलिंदनगर, वेताळनगर, उद्योगनगर, पत्रा शेड या ठिकाणी घरे बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी ३१ मार्च २०१५ पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित होते. या प्रकल्पासाठी मे. ओंकार असोसिएट्स यांची वास्तुविशारद म्हणून नेमणूक केली, त्यांना आजपर्यंत १२ कोटी २५ लाख रुपये रक्कम अदा करण्यात आली. तर, मे. ओंकार क्रिएशन्स यांची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमणूक होती, त्यांना १० कोटी ११ लाख रुपये अदा करण्यात आले. प्रकल्पासाठी विविध परवानग्या घेण्याची व त्यासाठी पाठपुरावा करण्याची जबाबदारी सल्लागार म्हणून त्यांची होती. ती त्यांनी वेळेत पूर्ण केली नाही. दोन्ही सल्लागारांनी आपली भूमिका चोखपणे बजावली नाही. त्यामुळे त्यांना अदा केलेले २२ कोटी ३६ लाख रुपये त्यांच्याकडून रीतसर वसूल करण्यात यावेत, असे मनसेने निवेदनात म्हटले आहे. यावर गटनेते अनंत कोऱ्हाळे, नगरसेवक राहुल जाधव, अश्विनी चिखले, शशी राजेगावकर, गणेश मोरे आदींच्या सह्य़ा आहेत.
पिंपरी पालिकेने सल्लागारांना दिलेले २२ कोटी रुपये वसूल करावेत
या सल्लागारांनी चुकीचे सल्ले दिले, त्यांच्यावरील जबाबदारी व्यवस्थित पार पाडली नाही, प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकला नाही, सात वर्षे रखडला, त्यास त्यांचे सल्ले कारणीभूत आहेत,
First published on: 06-04-2015 at 03:05 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pcmc mns suggestion adviser