वर्षभर ‘थंड’पणे चाललेल्या पिंपरी पालिकेतील मावळत्या स्थायी समितीने शेवटच्या बैठकीत जोरदार फलंदाजी करून तब्बल ३५० कोटींच्या विकासकामांना मंजुरी दिली. राष्ट्रवादीच्याच स्थानिक नेत्यांनी शहरातील विकासकामे अडवून धरली होती, असा गंभीर आरोप स्थायी समितीचे अध्यक्ष नवनाथ जगताप यांनी ‘जाता-जाता’ केला व राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला.
स्थायीच्या नव्या अध्यक्षपदासाठी सात मार्चला निवडणूक होत आहे. जगतापांच्या अध्यक्षतेखाली मावळत्या समितीची शेवटची बैठक होती. दोन टप्प्यात झालेल्या या बैठकीत २२५ विषयांना मान्यता देत ३५० कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली. गटबाजीच्या राजकारणामुळे स्थायी समिती ‘थंड’ चालली होती. समितीचे अध्यक्ष नवनाथ जगताप विरुद्ध शहराध्यक्ष योगेश बहल व पक्षनेत्या मंगला कदम यांच्यात वर्षभर संघर्ष होत होता. त्यावरून स्थायीचे अर्थकारण रंगले होते. जगतापांची ‘उद्दिष्टपूर्ती’ होऊ नये, याची पूर्ण व्यवस्था लावण्यात आली होती. त्यामुळे अध्यक्षांच्या मनासारखे विषय समितीसमोर येत नव्हते. त्यातून समिती विरुद्ध नेते असा राष्ट्रवादीत वाद रंगला होता, तो थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत गेला होता. शेवटच्या बैठकीपर्यंत ‘खास’ विषय दाखल होऊ दिले गेले नव्हते. त्यामुळे नाराज झालेले जगताप अंदाजपत्रकीय सभेस गैरहजर राहिले. त्यांच्या अनुपस्थितीत विनया तापकीरांनी अंदाजपत्रक मांडले होते. आचारसंहिता लागू होणार असल्याने महत्त्वाचे विषय अडकून ठेवणे पक्षाच्या हिताचे नाही, असा विचार झाला. स्थायी समितीने आमदार व महापौरांची मनधरणी केली. अखेर, त्यांनी समितीची बाजू घेतल्याने वेगवान हालचाली झाल्या. ऐनवेळीचे विषय धडाधड दाखल झाले आणि शेवटच्या बैठकीत ३५० कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. पत्रकार परिषदेत बोलताना जगतापांनी शहराध्यक्ष व पक्षनेत्यांचे उट्टे काढण्याची संधी सोडली नाही. पक्षातील गटबाजीमुळे विकासकामे झाली नाहीत. त्यांनी महत्त्वाची कामे अडवून ठेवली होती. लोकसभा निवडणुकीत नाराजी नको म्हणून आमदार त्यांना काही बोलत नव्हते, त्याचा त्यांनी गैरफायदा घेतला, अशी टीका त्यांनी केली. माजी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत त्यांच्यानंतर अधिकाऱ्यांना धाक राहिलेला नाही, याकडे जगतापांनी लक्ष वेधले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा