पिंपरी : वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळून किवळेतील दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. १५ एप्रिल ते १५ जून २०२५ या दोन महिने कालावधीत होर्डिंगवर जाहिरातफलक लावण्यास परवानगी दिली जाणार नाही. दोन महिने होर्डिंग जाहिरातीविना ठेवण्याचा निर्णय आकाशचिन्ह व परवाना विभागाने घेतला आहे. या निर्णयाला होर्डिंगचालकांनीही होकार दर्शविला आहे.
नेत्याचा वाढदिवस, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक यासह कोणत्याही कार्यक्रमाची होर्डिंगवर जाहिरात केली जाते. अनेक जण त्यासाठी महापालिकेची परवानगी घेत नसल्याचे वेळाेवेळी समाेर आले. अशा हाेर्डिंगधारकांवर महापालिका प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचाही यासाठी वापर केला जात आहे. किवळे येथे १७ एप्रिल २०२३ रोजी अनधिकृत हाेर्डिंग काेसळून पाच मजुरांचा मृत्यू झाला हाेता. या दुघर्टनेनंतर महापालिकेने शहरातील १७४ अनधिकृत हाेर्डिंग जमीनदाेस्त केले. शहरात एक हजार ४०० हाेर्डिंग अधिकृत आहेत. होर्डिंगचे सर्वेक्षण सुरूच आहे.
शहरातील होर्डिंगचालक आणि आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक महापालिकेत झाली. वादळी वारे, अवकाळी पावसामुळे होर्डिंग कोसळून अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी १५ एप्रिल ते १५ जून असे दोन महिने होर्डिंगवर जाहिरातफलक न लावण्याच्या सूचना होर्डिंगचालकांना दिल्या आहेत. या काळात होर्डिंग रिकामे ठेवण्यात यावेत. होर्डिंगचे लोखंडी स्ट्रक्चर, पाया खराब असल्यास ते तत्काळ दुरुस्त करून घ्यावे. स्थापत्यविषयक लेखापरीक्षण करावे, अशा सूचना महापालिकेने दिल्या आहेत.
होर्डिंगचालकांच्या तक्रारी
होर्डिंगवरील मोजमाप, उंची, स्थिरतेबाबत नियमबद्ध तपासणी करावी. चाळीस फुटांपेक्षा उंच होर्डिंग आणि ३० बाय ४० फुटांपेक्षा मोठ्या जाहिरातींवर कारवाई होत नाही. होर्डिंगचे मोजमाप आणि तपशील चार बाय तीन फुटांच्या पाटीवर लिहिणे बंधनकारक असूनही, त्याचे पालन होत नाही. पाच, दहा, पंधरा, वीस, पंचवीस वर्षांपूर्वीचे किती जाहिरात होर्डिंग आहेत, याची माहिती उपलब्ध करून दिली जात नाही, अशा तक्रारी होर्डिंगचालकांनी केल्या.
स्थिरता प्रमाणपत्र देण्यास ‘सीओईपी’चा नकार
किवळेतील दुर्घटनेनंतर शहरात नवीन होर्डिंग उभारण्यासाठी पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) या संस्थेच्या स्थिरता प्रमाणपत्राची अट बंधनकारक केली होती. आता ‘सीओईपी’नेच प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे महापालिकेच्या अभियंत्यांकडूनच स्थिरता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
पावसाळ्यापूर्वीच्या वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत होर्डिंगवर जाहिरात लावली जाणार नाही. होर्डिंग रिकामे ठेवले जाणार आहेत. होर्डिंगचे स्ट्रक्चर खराब झाले असल्यास ते तातडीने दुरुस्त करून घेण्याच्या सूचना होर्डिंगचालक, मालकांना दिल्या आहेत, असे आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त प्रदीप ठेंगल यांनी सांगितले.