पिंपरी : महापालिकेत कायम आणि कंत्राटी असे दहा हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावे असलेल्या मालमत्तेचा मालमत्ताकर २८ फेब्रुवारीपर्यंत जमा करण्याचा आदेश अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी दिला आहे. मालमत्ताकर न भरणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन काढले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून मालमत्ताकर वसुलीची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. थकबाकीदारांच्या मालमत्ता लाखबंद (सील) करून जप्त करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ८५० मालमत्ता लाखबंद करण्यात आल्या आहेत. त्यात सर्वाधिक मालमत्ता या बिगरनिवासी आहेत, तर ४३८ मालमत्तांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महापालिकेचे बहुतांश अधिकारी व कर्मचारी हे पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास आहेत. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावे शहरात मालमत्ता आहेत. त्यामुळे त्यांनाही मालमत्ताकर भरण्याची सक्ती करण्यात आली आहे.
महापालिका आस्थापनावरील, तसेच कंत्राटी, हंगामी, मानधनावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत मालमत्ताकर भरणे सक्तीचे करण्यात आले आहे. तसेच, कुटुंबातील व्यक्तीच्या नावे मालमत्ता असल्यास कर भरण्याची सक्ती करण्यात आली आहे. कर भरल्याची पावती विभागातील आस्थापना लिपिकाकडे सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. शहरात मालमत्ता नसल्यास तसे प्रमाणपत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांना द्यावे लागणार आहे. मालमत्ताकराचे देयक न भरल्यास कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन दिले जाणार नाही, असे अतिरिक्त आयुक्त जांभळे यांनी आदेशात नमूद केले आहे.
ठेकेदारांनाही सक्ती महापालिकेकडे हजारो ठेकेदार काम करतात. मोठे, तसेच अनेक लहान ठेकेदार आणि पुरवठादार महापालिकेची कामे करतात. त्यातील बहुतांश ठेकेदार व त्यांचे प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड शहरात राहतात. त्यांच्या शहरात मालमत्ता आहेत. त्यांनीही मालमत्ताकराचा भरणा करावा, असा आदेश काढण्यात आला आहे. मालमत्ताकर भरल्याची पावती सादर केल्यानंतरच ठेकेदारांना कामाचे देयक दिले जाणार आहे.