पिंपरी पालिकेत सध्या भलतीच लगबग दिसून येत आहे. लोकसभा निवडणुका जवळ आल्याने महापालिकेच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. नव्या कामांची भूमिपूजने, तयार असलेल्या प्रकल्पांच्या उद्घाटनांची भरगच्च यादीच तयार असून बडय़ा नेत्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमांचा धडाका लावण्यात येणार आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच उद्घाटने उरकण्याची प्रशासनाची देखील लगबग दिसून येत आहे.
जवळपास १२५ कोटी रूपये खर्च करून उभारलेला नाशिकफाटा येथील दुमजली उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. पिंपळे गुरव येथील काशिद वस्तीतील काही घरे रस्त्यात येत होती. ती काढण्यास संबंधितांचा विरोध होता. चर्चेच्या अनेक फे ऱ्यांनंतरही तोडगा निघत नव्हता. अखेर, पालिकेने मंगळवारी ती घरे पाडल्याने पुलाच्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा झाला. स्वस्तात घर देण्याच्या ‘घरकुल’ योजनेतील दुसऱ्या टप्प्यातील जवळपास २२०० घरांचे वाटप होणार असून त्यासाठी आवश्यक सोडतही काढण्यात आली आहे. विठ्ठलनगर, अजंठानगर, वेताळनगर येथील पुनर्वसन प्रकल्पातील घरांच्या वाटपाचे नियोजन आहे. पालिकेतील सध्याची चार प्रभागांची संख्या सहापर्यंत वाढवण्यात आली असून त्याचे उद्घाटन प्रस्तावित आहे. नागरिकांच्या सनदीची पुस्तिका तयार असून त्याचे प्रकाशन होणार आहे. प्रभागनिहाय नागरी सुविधा केंद्र सुरू करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यातील पाच केंद्रांचे उद्घाटन होणार आहे. सारथी हेल्पलाईन पुस्तिकेची इंग्रजी आवृत्ती तयार असून त्याचे प्रकाशन होईल, त्यानंतर हिंदूी आवृत्ती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय, बीआरटीएस मार्ग तयार आहे. त्याचे उद्घाटन आता ठेवायचे की विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर, याबाबत ‘वरून’ आदेश आलेले नाहीत. थेरगाव येथील उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी अजित पवार आले, तेव्हा फेब्रुवारीअखेर सर्व कार्यक्रम उरकून घ्या, असे सूतोवाच त्यांनी केले होते. त्यादृष्टीने प्रशासनाने तत्परतेने काम सुरू केले आहे. कोणती कामे तयार आहेत, कोणती उद्घाटने घ्यायची आहेत, याची माहिती एकत्रित करण्यात येत आहे. अजितदादांच्या सूचनेनुसार ही यादी अंतिम केली जाईल. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादीतील बडी नेते मंडळी या कार्यक्रमांसाठी हजेरी लावणार असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा