पिंपरी महापालिकेच्या मिळकतींची सध्याची परिस्थिती काय आहे, ते अधिकाऱ्यांनाच माहिती नाही. मिळकतींची जवळपास साडेसहा कोटींची थकबाकी आहे, ती वसूल करण्याची कोणतीही योजना नाही. पालिकेने बांधलेल्या ८३१ व्यापारी गाळ्यांपैकी ३७५ गाळे पडून आहेत. तर, १७५ गाळे बांधले, तेव्हापासूनच रिकामे आहेत. अशाप्रकारे पालिकेच्या भूमी-जिंदगी विभागाची ‘कार्यतत्परता’ आयुक्त राजीव जाधव यांच्यासमोरच उघड झाली.
आमदार लक्ष्मण जगताप यांनी भूमी-जिंदगी विभागातील विविध प्रश्नांसाठी चिंचवडच्या ऑटो क्लस्टर सभागृहात आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक घेतली. मिळकतींची यादी तसेच या विभागातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा व थकबाकीचा तपशील सादर करण्यास सांगितले असता, त्याची माहिती अधिकाऱ्यांकडेच नव्हती. शेकडो मिळकतींची थकबाकी वसूल केली जात नाही. तब्बल साडेसहा कोटींची थकबाकी असल्याची कबुली अधिकाऱ्यांनी या वेळी दिली. त्यातील पाच कोटी रुपये सहा वर्षांपासून वसूलच करण्यात येत नाही. भाडय़ाने दिलेल्या मिळकतींची मुदत संपून पाच ते दहा वर्षे झाले, तरीही पुढील कार्यवाही होत नाही. विविध भागांमध्ये बांधलेल्या भाजी मंडईतील ८३१ गाळ्यांपैकी ३७५ गाळे पडून आहेत तर १७५ गाळे सुरुवातीपासून रिकामेच आहेत. मिळकतींच्या भाडेवसुलीच्या टक्केवारीचे प्रमाण अवघे २० टक्के आहे, आदी मुद्दे आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. भूमी-िजदगी विभागाच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत रिकामे व पडून असलेले गाळे मार्गी लावा, भाडेवसुलीसाठी कडक पावले उचला, अशी सूचना जगतापांनी केली. महापालिकेच्या सर्व मिळकतींचे सर्वेक्षण करण्याची मागणी जगतापांनी केल्यानंतर खासगी संस्थेच्या माध्यमातून मिळकतींचे सर्वेक्षण करण्याची ग्वाही आयुक्तांनी बैठकीत दिली. या वेळी नगरसेविका सीमा सावळे, आशा शेंडगे, सारंग कामतेकर, सहायक आयुक्त योगेश कडूसकर, नगररचनाकार प्रशांत शिंपी आदी उपस्थित होते.
–चौकट–
समाजमंदिरांमध्ये नशाबाजांचे अड्डे
महापालिकेने शहराच्या विविध भागात बांधलेली समाजमंदिरे म्हणजे नशाबाजांचे अड्डे झाले आहेत व त्याकडे पालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याची बाब बैठकीत मांडण्यात आली, तेव्हा आयुक्त राजीव जाधव यांनी तातडीने स्थळपाहणी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

Story img Loader