पिंपरीचे माजी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी पालिकेकडून मिळणारा हक्काचा ९० हजार रुपयांचा बोनस विनम्रपणे नाकारला आहे. केंद्रीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असल्याने अशाप्रकारे बोनस स्वीकारू नये, या संकेतानुसार त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.
डॉ. श्रीकर परदेशी हे दीड वर्षांपूर्वी पिंपरी पालिकेत रुजू झाले होते. जवळपास १८ महिने ते आयुक्तपदावर होते. अनधिकृत बांधकामांवरील बेधडक कारवाईमुळे ते राज्यभर चर्चेत आले होते. याशिवाय, पालिकेतील भ्रष्ट कारभाराला आळा, कामचुकार व गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन व शिस्तप्रिय कार्यपद्धतीमुळे ते शहरातील जनतेच्या कौतुकास पात्र ठरले होते. तथापि, त्यांचा प्रामाणिकपणा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला त्रासदायक ठरत होता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या ‘दुकानदार’ नेत्यांनी तत्कालीन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे त्यांच्या कार्यपद्धतीविषयी सातत्याने तक्रारी केल्या. काही प्रकरणात परदेशी यांनी अजितदादांनाही जुमानले नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अजितदादांच्या तेव्हाच्या शीतयुद्धात परदेशी यांच्या बदलीचा निर्णय झाला, त्यासाठी अजितदादांनी प्रतिष्ठेचा मुद्दा केला होता. त्यानुसार, त्यांची बदली झाली. सुरुवातीला ते नोंदणी महानिरीक्षक पदावर होते. या वेळी त्यांच्याकडे पीएमपीचा अतिरिक्त कार्यभारही होता. पुढे, त्यांची पंतप्रधान कार्यालयात बदली झाली. जेव्हा ते पिंपरी पालिकेत होते, त्या कालावधीतील दिवाळीचा ९० हजार रुपयांचा दिवाळी बोनस त्यांना देण्यात आला. पिंपरी पालिका प्रशासनाने याबाबतचा धनादेश तयार करून तो परदेशी यांना पाठवला होता. तथापि, त्यांनी तो विनम्रपणे परत पाठवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा