‘स्मार्ट सिटी’तून वगळण्यात आल्याचा अनपेक्षित धक्का बसलेल्या पिंपरी पालिकेने यापुढे शहरविकासाचे व्यवस्थित सादरीकरण करण्यास प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आगामी वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये ‘सुंदर माझे पिंपरी-चिंचवड’ या विषयावर छायाचित्रकारांची मुक्त स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे असून उत्कृष्ट छायाचित्रांचे स्वतंत्र प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे.
पिंपरी पालिकेच्या वर्धापनदिनाचे नियोजन करण्यासाठी महापौर शकुंतला धराडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. उपमहापौर प्रभाकर वाघेरे, स्थायी समितीचे अध्यक्ष अतुल शितोळे, आयुक्त राजीव जाधव, प्रभाग अध्यक्ष संदीप चिंचवडे, अरुण टाक, विनया तापकीर, शुभांगी बोऱ्हाडे. गटनेते सुलभा उबाळे, सुरेश म्हेत्रे आदी उपस्थित होते. वर्धापनदिनी रविवार असल्याने दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी (१२ ऑक्टोबर) सर्व कार्यक्रम होणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, उद्योजक व गुणवंत कामगारांचे सत्कार, रक्तदान, नेत्रदान शिबिर आदी कार्यक्रमांचा त्यात समावेश आहे. बैठकीचे सूत्रसंचालन प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे यांनी केले.