पिंपरी-चिंचवडचे राजकारण ‘गावखाती’ स्वरूपाचे मानले जाते. वाढत्या नागरीकरणातही शहराच्या राजकारणावर गावखाती राजकारणाचा व नात्यागोत्याचा प्रभाव कायम राहिला आहे. यंदाच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही पुन्हा नात्यागोत्याचे राजकारण दिसून आले. पण, वेगळ्या अर्थाने. आतापर्यंत पदे देताना स्थानिक नेते नातीगोती पाहत होते, तेच काम आता अजित पवारांनी केले आहे. त्यामुळे अजितदादांवर स्वकीयांची भलतीच नाराजी ओढावल्याचे चित्र पुढे आले आहे.
स्थायी समितीसाठी राष्ट्रवादीत नगरसेवकांची तीव्र चढाओढ होती. चार जागांसाठी ५७ नगरसेवक इच्छुक होते. त्या चार सदस्यांची निवड करताना अजितदादांनी स्थानिक नेत्यांच्या शिफारशी डावलल्या. स्वत:च्या अधिकारात नियुक्तया करून त्यांनी सर्वानाच धक्का दिला, तेथेच पहिली ठिणगी पडली होती. त्यातच, अध्यक्षपदासाठी सर्व १२ सदस्य तीव्र इच्छुक असताना अजितदादांनी अतुल शितोळे यांची निवड केली. दिवंगत माजी महापौर नानासाहेब शितोळे यांचे अतुल हे चिरंजीव आहेत. शरद पवारांचे विश्वासू तसेच पवारांचे नातेवाईक म्हणून त्यांची ओळख होती. वडिलांची हीच पुण्याई कामी आल्याने प्रथमच निवडून आलेल्या शितोळे यांची अध्यक्षपदी वर्णी लागली. स्थानिक नेत्यांपाठोपाठ ज्येष्ठांना तसेच अध्यक्षपदाच्या प्रबळ दावेदारांना डावलण्यात आल्याने पक्षात नाराजीचा आगडोंब उसळला आहे. तथापि, उघडपणे कोणी भाष्य करत नाही. तथापि, माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करून ही कोंडी फोडली आहे. याखेरीज, विलास लांडे यांच्यासह अन्य स्थानिक नेत्यांमध्ये तोच सूर आहे. तथापि, ते योग्य वेळेच्या शोधात आहेत. अजितदादांवर विसंबून असलेल्या अपक्षांना संधी न मिळाल्याने ते रुसले आहेत. आतापर्यंत स्थानिक नेत्यांनी पदेवाटप करताना नात्यागोत्याचे राजकारण केले, त्यावरून बऱ्याच घडामोडी झाल्या. वेळप्रसंगी अजितदादांनी संबंधितांची कानउघडणी केल्याचे दाखले आहेत. तथापि, स्वत: पवारांनीही शितोळे यांच्या निमित्ताने तोच कित्ता गिरवल्याचे दिसून आले.
सोयीच्या राजकारणाची परंपराच
बाबासाहेब तापकीर, हनुमंत गावडे, सुरेश सोनवणे, हिरामण बारणे, आझम पानसरे, अशोक कदम, काका लांडे, लक्ष्मण जगताप, शरद गावडे, वर्षां आगरवाल, योगेश बहल, प्रकाश रेवाळे, नाना थोरात, शमीम पठाण, श्रीरंग बारणे, अण्णा बनसोडे, सुरेखा लोंढे, राजाराम कापसे, राजेंद्र राजापुरे, प्रशांत फुगे, विलास नांदगुडे, माई ढोरे, अजित गव्हाणे, उषा वाघेरे, ज्ञानेश्वर भालेराव, प्रशांत शितोळे, सुमन पवळे, जगदीश शेट्टी, नवनाथ जगताप, महेश लांडगे आणि आता अतुल शितोळे यांना पिंपरी पालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. बहुतांश वेळी आपल्या जवळच्या नगरसेवकास त्या पदावर बसवण्यासाठी ‘सोयीचे’ तसेच नात्यागोत्याचे राजकारण झाल्याची उदाहरणे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा