‘श्रीमंत’ पिंपरी महापालिकेतील नगरसेवकांना मिळत असलेले साडेसात हजार रुपयांचे मानधन अतिशय कमी असल्याचे सांगत यापुढे २५ हजार रुपये मानधन देण्याचा प्रस्ताव महापौरांनी मांडला व स्थायी समितीने कोणतीही चर्चा न करता त्यास मान्यता देऊन टाकली. राज्यशासनाच्या मान्यतेनंतरच पुढील कार्यवाही होणार आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष नवनाथ जगताप यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या सभेसाठी महापौर मोहिनी लांडे यांनी ऐनवेळी एक प्रस्ताव पाठवला. पालिका सदस्यांचे सध्याचे साडेसात हजार रुपये अतिशय कमी असल्याने त्यात वाढ करण्यात यावी, यापुढे नगरसेवकांना २५ हजार रुपये मानधन मिळावे, असा आशय त्यात होता. जगताप यांनीही तप्तरतेने तो प्रस्ताव दाखल करून घेतला आणि कोणतीही चर्चा न करता त्यास मंजुरी देऊन टाकली.
यासंदर्भात, महापौरांनी पत्रकारांना सांगितले, की नगरसेवक सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट, सुरेश म्हेत्रे यांनी आपल्याशी झालेल्या चर्चेत हा मुद्दा मांडला होता. त्यानुसार, आपण स्थायी समितीकडे सदस्यांच्या भावना कळवल्या व मानधन वाढीचा प्रस्ताव दिला. तथापि, आपण अशाप्रकारे कोणतीही मागणी केली नसल्याचे या सदस्यांनी स्पष्ट केले आहे. हा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठवण्यात येणार असून त्यांच्या मान्यतेनंतरच पुढील कार्यवाही होईल, असे जगताप यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा