अनेकविध प्रयत्नांचा एकत्रित परिणाम
पिंपरी : मुंबई-पुण्यात करोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना, प्रारंभीच्या काळात अग्रस्थानी राहिलेल्या िपपरी-चिंचवड शहरात सद्य:स्थितीत तुलनेने रुग्णांची संख्या कमी आहे. करोनाबाधित २१ रुग्णांपैकी १२ रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. उर्वरित नऊ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांत नवा रुग्ण आढळला नव्हता. मात्र, बुधवारी सायंकाळी आणखी एक रुग्ण आढळला.
शहरात करोनाचे एकदम १२ रुग्ण आढळून आले, त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिकेने वेगाने पावले टाकली. स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याच्या काळात केलेल्या उपाययोजनांचा अनुभव पालिका अधिकाऱ्यांच्या गाठीशी होता, त्याचा पुरेपूर उपयोग करोनाविषयक नियोजनासाठी झाल्याचे सांगण्यात आले. पालिकेचे चव्हाण रुग्णालय आणि भोसरी रुग्णालय फक्त करोना रुग्णांसाठी राखीव ठेवून तेथील विलगीकरण कक्षात आवश्यक सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. सुमारे १५० जणांचा सहभाग असणारे ‘तत्काळ प्रतिसाद पथक’ स्थापन करण्यात आले. त्याद्वारे घरोघरी जाऊन नागरिकांकडून सर्दी, ताप, खोकला आदींची माहिती घेतली गेली. बाहेरून, परदेशातून कोणी नुकतेच आले आहे का, याची नोंद ठेवण्यात आली. आरोग्य, वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
पालिकेने हेल्पलाइनसाठी तसेच संपर्कासाठी जाहीर केलेल्या क्रमांकांमुळे नागरिक स्वत: हून माहिती देऊ लागले, त्यातून बरीच उपयुक्त माहिती पालिकेला समजू शकली. जर्मनीहून परतलेल्या १६ जणांची माहिती याच माध्यमातून मिळाली, त्यातून त्या सर्वाना होम क्वारंटाइन करता आले होते.
अशा अनेक प्रयत्नांमुळे करोना रुग्णांचा प्रसार तूर्त नियंत्रित ठेवण्यात पालिकेला यश मिळाल्याचे दिसून येते. पालिका प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका लोकप्रतिनिधींनी ठेवली.
गर्दी होऊ न देण्याची खबरदारी घेतानाच पोलिसांनी चोख कामगिरी बजावली. रुग्णालयातून पळून गेलेला करोनाचा रुग्ण शोधण्यापासून बाधित रुग्णांची संपर्क साखळी शोधण्याकामी त्यांचे सहकार्य मिळाल्याचे सांगण्यात येते.
वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी ‘विमा सुरक्षा कवच’
करोना विषाणूंच्या प्रतिबंधासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पिंपरी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना ‘विमा सुरक्षा कवच’ लागू करण्यात आले आहे. त्यानुसार, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, नर्स तथा इतर कर्मचाऱ्यांपैकी कोणाच्याही बाबतीत दुर्घटना घडल्यास सुरक्षा कवच म्हणून एक कोटी रुपये दिले जाणार असून त्याच्या वारसाला पालिका सेवेत सामावून घेण्यात येणार आहे.
पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध, संशयित रुग्णांची तत्काळ तपासणी आणि उपचार, आवश्यकतेनुसार होम क्वारंटाइन, प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्वेक्षण, त्याआधारे नियोजन असे कामाचे सूत्र ठेवण्यात आले आहे. नागरिकांकडून सहकार्य मिळत असून ते घरात थांबत आहेत. असेच सहकार्य कायम राहिल्यास आणि करोना विषाणूंचा प्रसार न झाल्यास नक्कीच हे आटोक्यात येऊ शकेल.
– श्रावण हर्डीकर, आयुक्त, पिंपरी पालिका
प्रशासन-लोकप्रतिनिधी मिळून प्रत्येक बाबतीत सूक्ष्म नियोजन करत आहोत. सुरुवातीपासून बाहेरून आलेल्या नागरिकांवर प्राधान्याने लक्ष देण्यात आले. घरोघरी जाऊन आरोग्यविषयक माहिती गोळा केली, त्याचा पुढे उपयोग झाला. होम क्वारंटाइन केलेल्या नागरिकांवर लक्ष ठेवा, असे संबंधित सोसायटय़ांना दिलेले पत्र उपयुक्त ठरले. सध्या रुग्णांची संख्या कमी आहे. भविष्यात रुग्ण वाढले तरी पालिकेची पूर्ण तयारी आहे.
– नामदेव ढाके, सत्तारूढ पक्षनेते, पिंपरी पालिका