पिंपरी : शहराच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने विविध भागांत उंच जलकुंभ (टाक्या) उभारले आहेत. आठ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत असलेले १०२ जलकुंभ कमी पडत असल्याने नव्याने २९जलकुंभांचे काम हाती घेण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. सद्य:स्थितीत लोकसंख्या २७ लाखांच्या घरात आहे. वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेमार्फत नवनवीन स्रोत निर्माण करण्यात येत आहेत. शहरवासीयांना पवना, आंद्रा धरणासह महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत (एमआयडीसी) पाणीपुरवठा केला जात आहे.
पवना धरणातून ५१० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी महापालिका दररोज उचलते. रावेत येथील पवना नदीवरील बंधाऱ्यातून अशुद्ध पाण्याचा उपसा करून ते निगडी प्राधिकरण येथील जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केले जाते. त्यानंतर जलवाहिनीद्वारे शहरातील विविध भागांतील जलकुंभामध्ये सोडून नागरिकांना वितरित केले जाते.
नव्याने विकसित झालेल्या भागात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने जलकुंभ उभारले जाणार आहेत. सध्या आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत १०२ जलकुंभ उभारण्यात आले आहेत. सन २०३१ ची लोकसंख्या गृहीत धरून नव्याने २९ जलकुंभ उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामनाथ टकले म्हणाले की, वाढते शहर आणि लोकसंख्येचा विचार करून पाण्याचे जलकुंभ उभारले जातात. नव्याने २९ जलकुंभ उभारण्यात येणार आहेत. त्याची कामे टप्प्याटप्प्याने हाती घेतली जाणार आहेत.