आठ लाख तक्रारींचे ‘सारथी’च्या माध्यमातून विश्लेषण; पिंपरी पालिकेचा निर्णय

पिंपरी पालिकेकडे गेल्या काही वर्षांत विविध माध्यमांचा आधार घेत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तब्बल आठ लाख तक्रारींचे विश्लेषण करण्यात येणार आहे. ‘सारथी’च्या माध्यमातून हे काम होणार असून तक्रारींचे स्वरूप, ठिकाण, कारणे आदी विविध बाजूने त्यावर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. ही माहिती एकत्र झाल्यानंतर अहवाल तयार करण्यात येणार असून त्याद्वारे पुढील कार्यवाहीची दिशा ठरवली जाणार आहे.

सारथी, पालिकेचे संकेतस्थळ, लघुसंदेश, लेखी तक्रारी, लोकशाही दिन, प्रत्यक्ष भेटून किंवा इतर मार्गाने पालिकेकडे तक्रारी केल्या जातात. गेल्या काही वर्षांत पिंपरी महापालिकेकडे आलेल्या जवळपास आठ लाख तक्रारी आहेत. आता या तक्रारींचे वर्गीकरण करून त्याचे विश्लेषण करण्यात येणार असल्याचे ‘सारथी’तून सांगण्यात आले. पालिकेकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये कोणत्या प्रकारच्या तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक आहे, कोणत्या भागातून अधिक प्रमाणात तक्रारी येतात, तसेच तक्रारदार व्यक्तींबद्दलच्या माहितीचाही अभ्यास होणार आहे. एखादा नागरिक वारंवार तक्रारी करतो आहे का, त्याचे कारण काय असेल, यामध्ये काही खोडसाळपणाचा प्रकार आहे का, याचीही माहिती घेतली जाणार आहे. विविध प्रकारची ही माहिती एकत्रित करण्यात येणार असून त्याचा अहवाल आयुक्त श्रावण हर्डीकर यांना देण्यात येणार आहे.

या विश्लेषणात्मक माहितीच्या आधारे प्रत्येक विभागाने काय आणि कोणती कार्यवाही करावी, याची दिशा ठरवली जाणार आहे.

डॉ. श्रीकर परदेशी पिंपरी पालिकेचे आयुक्त होते, तेव्हा त्यांनी ‘सारथी’ हेल्पलाइन सुरू केली. १५ ऑगस्ट २०१३ रोजी माजी उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले.

या उपक्रमाद्वारे शहरातील नागरिकांना कोणत्याही स्वरूपाची तक्रार नोंदवता येत होती. त्याचप्रमाणे, पालिकेशी संबंधित कोणतीही माहिती मिळू शकत होती. ‘सारथी’ची उपयुक्तता सिद्ध होत गेल्यामुळे तो उपक्रम कमालीचा लोकप्रिय ठरला होता. तथापि, परदेशी यांच्या बदलीनंतर ‘सारथी’कडे दुर्लक्ष झाले. त्यांच्या नंतरच्या आयुक्तांनी आपापल्या दृष्टिकोनातून ‘सारथी’कडे पाहिले. नागपूरचे आयुक्त असताना हर्डीकर ‘सारथी’ची माहिती घेण्यासाठी पिंपरी पालिकेत आले होते. आता ते स्वत: पिंपरी पालिकेचे आयुक्त आहेत.

Story img Loader