पिंपरी : पर्यावरण संतुलन राखण्यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवून उपाययोजना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी निधी उपलब्ध राहावा, याकरिता महापालिकेच्या अर्थसंकल्पात ‘हवामान अर्थसंकल्प’ असा स्वतंत्र समावेश करण्यात येणार आहे. याबाबतची अधिक माहिती देताना आयुक्त शेखर सिंह म्हणाले, ‘जागतिक तापमानवाढ, अतिउष्णतेच्या तीव्र लाटा, ऋतुमानातील बदल याचा सर्वांगीण विचार करून, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने महापालिका विविध उपक्रम राबवीत आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणे, हवा प्रदूषण करणाऱ्या घटकांवर निर्बंध घालणे, स्थानिक पर्यावरण सुधारणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशांत शासकीय, निमशासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी हवामान अर्थसंकल्प या संकल्पनेचा समावेश केला आहे. त्याअनुषंगाने आगामी अर्थसंकल्पात हवामान अर्थसंकल्पाचा समावेश केला जाणार आहे.’
हेही वाचा >>> पिंपरी : तळवडेत साकारणार जैवविविधता उद्यान; स्वच्छतेची कामे करणाऱ्या कंपनीला ७६ कोटींचे काम
हवामान अर्थसंकल्पाच्या संकल्पनेसंदर्भात मार्गदर्शक ध्येय, धोरणे, उद्दिष्ट्ये, कार्यपद्धती, सूचना, अर्थसंकल्प माहिती संकलन नमुने याबाबत खासगी संस्थेमार्फत अभ्यास करण्यात येऊन सूचना घेण्यात आल्या. त्या धोरणांचा व मार्गदर्शक सूचनांचा महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये समावेश केला जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला आयुक्तांनी मान्यता दिली. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहर झपाट्याने विस्तारात आहे. शहराची लोकसंख्या ३५ लाखापर्यंत पोहोचली आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर वाहनांची लोकसंख्याही वाढत आहे. शहरातील वाहनांची संख्या २० लाख आहेत. शहराच्या चारही बाजुंनी मोठ-मोठे गृहनिर्माण प्रकल्प विकसित होत आहेत. त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.