पिंपरी : आगामी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश, ऊबदार स्वेटर खरेदी केले जाणार आहेत. त्यासाठी येणाऱ्या २९ कोटींच्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महापालिकेच्या प्राथमिक १३८ शाळा, माध्यमिक १८ आणि बालवाडी २०३ शाळा कार्यान्वित आहेत. त्या शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत पन्नास हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांना शालेय वर्षे सुरू झाल्यानंतर गणवेश, खेळाचा गणवेश, स्वेटर, शालेय वह्या, दप्तर, रेनकोट, शूज, भूगोल व चित्रकला वह्या, विविध अभ्यासक्रमांची पाठ्यपुस्तके असे शालेय साहित्य मोफत दिले जाते. मागील वर्षापासून शालेय साहित्यासाठी प्रशासनाने थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) चा अवलंब केला आहे. परंतु, गणवेशासह हे शैक्षणिक साहित्य शिक्षण मंडळ अस्तित्वात असताना झालेल्या करारातील अटी व शर्तीनुसार आणि पुणे दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित ठेकेदारांकडून खरेदी केले जाते.

हेही वाचा…पिंपरी-चिंचवड महापालिकेत ‘ही’ नवीन गावे होणार समाविष्ट

त्याप्रमाणे महालक्ष्मी ड्रेसेस ॲण्ड टेलरिंग फर्म, श्री प्रेस्टीज गारमेट्स ॲण्ड टेलरिंग फर्म आणि श्री वैष्णवी महिला कॉर्पोरेशन यांच्याकडून सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी शालेय गणवेश आणि स्वेटर खरेदी करून वाटप केले जाणार आहेत. दरम्यान, या खरेदीसाठी प्राथमिक विभागाने अर्थसंकल्पात २२ कोटी ६८ लाख तर माध्यमिक विभागाने सात कोटी इतकी तरतुदीची मागणी केली आहे. त्यानुसार गणवेश खरेदीवर २९ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pcmc to purchase uniforms for municipal school students commissioner approves 29 crore expenditure pune print news ggy 03 psg