पीएमपीएमएलचे संचालक तुकाराम मुंढे यांचे स्पष्टीकरण
पीएमपीएमएलसाठी निधी देताना तो विषय स्थायी समिती किंवा सर्वसाधारण सभेकडे जातो. हा दोन्ही महापालिकांचा अंतर्गत प्रश्न आहे. अंतर्गत प्रश्नांसाठी पीएमपीएमएलचा कोणी अधिकारी उपस्थित राहणे अपेक्षित नाही. त्यामुळे संचालक म्हणून कोठेही जाण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्ट करत पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीसाठी जाणार नसल्याचे सूतोवाच बुधवारी केले.
पिंपरी पालिकेकडून निधी हवा असल्यास मुंढे यांनी स्वत:च बैठकीसाठी आले पाहिजे, असा फतवा स्थायी समितीने दुसऱ्यांदा काढला होता. बुधवारी पिंपरी महापालिकेची स्थायी समितीची बैठक होती. दोन्ही महापालिकांकडून पीएमपीला २०१५-१६ पर्यंत सुमारे २३ कोटी निधी येणे बाकी आहे. या पाश्र्वभूमीवर मुंढे यांनी स्पष्टीकरण दिले.
मुंढे म्हणाले,‘ पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिका पीएमपीएमएल कंपनीच्या अध्यक्ष व मालक आहेत. त्यामुळे कंपनीच्या भांडवलामध्ये योगदान द्यायचे किंवा नाही, हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. त्याबाबत मी काही बोलू शकत नाही. ही त्यांचीच कंपनी असून मी केवळ व्यवस्थापकीय संचालक आहे. संचालक मंडळाच्यावतीने मी कामकाज चालवतो. ही कंपनी स्थापन करताना पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांनी अनुक्रमे ६० : ४० प्रमाणे निधी देण्याचा नियम शासनाने केला आहे. त्या वेळी दोन्ही महापालिकांनी होकार दिल्यानंतर नियमांनुसार ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे.
कंपनीला किती तोटा आहे, ते दोन्ही महापालिकांना दररोज, महिन्याला किंवा वार्षिक कळवले जाते. तोटय़ानुसार ६०:४० निधी देण्याचे प्रमाण ठरले आहे. जी माहिती पाहिजे ती सर्व महापालिकांना दिली जाते. परंतु, कंपनीचे संचालक आल्याशिवाय आम्ही निधी देणार नाही, असे म्हणणे बरोबर नाही. ही कंपनी ज्या नियमांनुसार स्थापन झाली आहे, त्यानुसारच कामकाज सुरु आहे, असेही मुंढे यांनी सांगितले.
रस्त्यावर धावणाऱ्या बसेस आणि उत्पन्न दोन्ही वाढले
दोन महिन्यांपूर्वी प्रतिदिन १२०० ते १२५० बसेस धावायच्या आणि प्रवासी ६ ते ७ लाख होते. आता दररोज १४०० ते १५०० बसेस धावतात आणि प्रवासी आठ लाखांपर्यंत पोहोचले आहेत. वाढलेल्या २५० बसेस सर्व पीएमपीच्या स्वत:च्या आहेत. प्रवाशांची संख्या ई-तिकिटानुसारच असून पासचे आकडे पकडल्यास प्रतिदिन ९ लाखांपर्यंत जाते. वर्षभरात एप्रिल-मे आणि जूनचे पहिले पंधरा दिवस हा काळ मंदीचा असतो. मात्र, यंदा एप्रिल-मे दोन महिन्यात २००७ पासूनचे सर्वाधिक उत्पन्न झाले आहे, अशी माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली.