पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत हाेर्डिंगवर महापालिकेचे पथक कारवाईसाठी गेल्यानंतर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी विराेध करतात, वाद घालतात. या प्रकारामध्ये वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने विधानसभा उपाध्यक्षांसह शहरातील खासदार, आमदार आणि सर्वपक्षीय शहराध्यक्षांना पत्र पाठविले आहे. अनधिकृत हाेर्डिंग न लावण्याबाबत कार्यकर्त्यांना सांगण्याची विनंती पत्रातून केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात १,४०० हाेर्डिंग अधिकृत आहेत. नेत्यांचा वाढदिवस, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यक्रमांसह महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी, सण, उत्सव अशा विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने हाेर्डिंगवर जाहिरात केली जाते. अनेक जण अनधिकृत हाेर्डिंग उभारून जाहिरात करत असल्याचे दिसून आले आहे. महापालिकेची परवानगी घेतली जात नाही.
किवळेत दाेन वर्षांपूर्वी वादळी वाऱ्यामुळे अनधिकृत हाेर्डिंग काेसळून पाच मजुरांचा मृत्यू झाला हाेता. या घटनेनंतर महापालिकेन शहरातील अनधिकृत हाेर्डिंगवर कारवाई केली. यामध्ये अनेक राजकीय पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते, नातेवाइकांचे फलक काढून घेऊन गुन्हे दाखल केले हाेते.
शहरातील अनधिकृत हाेर्डिंग, बॅनर, किऑक्स, गॅन्ट्रीवर महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या पथकामार्फत कारवाई केली जाते. मात्र, पथक कारवाईसाठी गेल्यानंतर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी विराेध करतात. या प्रकारांमध्ये वाढ झाल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे लाेकप्रतिनिधींना पत्र पाठविले आहे.
राजकीय पक्षांच्या नेत्यांचा वाढदिवस, महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी, तसेच विविध सण, उत्सवाची जाहिरात प्रसिद्ध करायची असल्यास अधिकृत हाेर्डिंगचा वापर करावा, तशा सूचना आपल्या कार्यकर्त्यांना द्याव्यात, शहरामध्ये काेणत्याही प्रकारचे अनधिकृत हाेर्डिंग न लावण्याबाबत कार्यकर्त्यांना सांगावे, असे पत्रात म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा हवाला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेब्रुवारी महिन्यात शहर दाैऱ्यावर असताना अनधिकृत हाेर्डिंगवर कारवाईचा आदेश दिला हाेता. ‘माझे छायाचित्र असलेले अनधिकृत हाेर्डिंग सर्वांत अगाेदर काढावे,’ असे त्यांनी म्हटले होते. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाला सकारात्मक प्रतिसाद दिसून आल्याचेही पत्रात म्हटले आहे.
‘एआय’द्वारे सर्वेक्षण पूर्ण
शहरातील हाेर्डिंगचे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाद्वारे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या सर्वेक्षणात सात अनधिकृत हाेर्डिंग आढळून आली आहेत. सर्वेक्षणात आढळून आलेल्या हाेर्डिंगच्या लांबी, रुंदीची तपासणी केली जाणार आहे. महिनाभरात त्याचा अहवाल येणार आहे.
अनधिकृत हाेर्डिंगधारकांवर कारवाई केली जात आहे. ऑक्टाेबर २०२४ पासून अनधिकृत हाेर्डिंग लावणाऱ्यांकडून १३ लाख ६० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर, १४ जणांविराेधात गुन्हे दाखल केले आहेत. प्रदीप ठेंगल, उपायुक्त, आकाशचिन्ह व परवाना विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका