पिंपरी : महापालिका स्थापनेस २०३२ रोजी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने महापालिकेने व्हीजन @ ५० शहर धोरण हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत विविध विषय आणि भविष्यात येणाऱ्या समस्यांवर महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची मते, सल्ले, उपाययोजना जाणून घेण्यासाठी गटचर्चा घेण्यास सुरुवात केली आहे. पुढील सहा आठवडे भागधारकांसमवेत गटचर्चा होणार आहे.

व्हीजन @५० शहर धोरण उपक्रमांतर्गत येत्या सात वर्षांत महापालिका सेवांमध्ये सुधारणा करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सुधारणा करण्यासाठी दीर्घकालीन धोरण विकसित करणे, शहराचा सर्वांगीण विकास करणे, शहरातील प्रत्येक नागरिकाला शहराची ओळख निर्माण करण्यासाठी विकास धोरणात समाविष्ट करणे, पर्यावरणपूरक, शहरविकासासाठी आवश्यक परिणामांची वेगवान अंमलबजावणी करणे आणि महापालिकेचे कामकाज आणखी पारदर्शक होण्यासाठी शहरवासीयांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. ही सर्व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शहरी गतिशीलता, पर्यावरण आणि राहणीमान, शिक्षण आणि कल्याण, तंत्रज्ञान आणि प्रशासन, शहरी पायाभूत सुविधा, आर्थिक विकास या प्रमुख विषयांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या सर्व विषयांना केंद्रस्थानी ठेवून गटचर्चेमध्ये सहभागी झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रश्नावली देण्यात आली होती. या प्रश्नावलीच्या आधारे उपस्थितांनी आपली मते किंवा भविष्यात उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर उपाययोजना मांडल्या आहेत.

हेही वाचा >>> पिंपरी : अवैध सावकारी करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई; पोलीस आयुक्तांचा आदेश

याबाबत उपायुक्त विठ्ठल जोशी म्हणाले, ‘शहराला केवळ औद्योगिकनगरी म्हणून नाही, तर आता स्मार्ट सिटी म्हणूनही ओळखले जाते. प्रगतीच्या दिशेने ही वाटचाल सुरू असताना २०३२ मध्ये महापालिकेस ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यासाठी २०३२ पर्यंत व्हीजन @५० या उपक्रमाच्या माध्यमातून महापालिकेने काही ध्येये ठरविली आहेत. ती पूर्ण करण्यासाठी व्हीजन@५० शहर धोरण उपक्रमात अधिकारी, कर्मचाऱ्यांसमवेत नागरिकांचाही सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. त्यासाठी विविध गटचर्चांचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> बारामती स्वतंत्र जिल्हा निर्मितीची अफवा; राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांसमवेत शहरातील भागधारकांनादेखील सहभागी करून घेण्यात येत आहे. नागरिकांच्या गरजा समजून घेऊन शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी हा उपक्रम फायदेशीर ठरणार आहे. शहराचा सर्वांगीण विकास होण्यास यामुळे मदत मिळणार असल्याचे जोशी यांनी स्पष्ट केले.

सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या विविध भागधारकांना देखील व्हीजन@५० शहर धोरण या उपक्रमात सहभागी करून घेण्यात येणार आहे. यासाठी पुढील सहा आठवडे चालणाऱ्या या गटचर्चेमध्ये त्यांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांसमवेत त्यांनी मांडलेल्या प्रतिक्रिया, सल्ले, उपाय यावरही चर्चा करण्यात येणार असल्याचे जोशी यांनी सांगितले. व्हीजन @५० शहरी धोरण उपक्रमांतर्गत शहरी विकासासाठी आवश्यक उपाययोजनांची नवी दारे उघडण्यास आणि आरोग्य, वैद्यकीय, पर्यावरण, शहरी गतिशीलता, शिक्षण, तंत्रज्ञान या प्रमुख विषयांवर लक्ष केंद्रित करून सर्वांगीण विकास साधण्यास मदत मिळणार आहे. या उपक्रमात भागधारकांचा सहभाग वाढविल्याने महापालिकेचा कारभार अधिक पारदर्शक होण्यास मदत मिळणार असल्याचे आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.

Story img Loader