लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : कोट्यवधी रुपये खर्च करून शहरातील विविध भागांत महापालिकेने उभारलेले पादचारी पूल वापराविना पडून आहेत. अनेक पादचारी पुलांचा वापर नागरिकांकडून केला जात नाही. काही पादचारी पुलांच्या पायऱ्या तुटल्या आहेत. तर, काही पुलांची लिफ्ट बंद अवस्थेत आहे. काही पुलांवर घाणीचे साम्राज्य असून, मद्यपींकडूनही पुलाचा वापर होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
रस्ता ओलांडताना नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा, या हेतूने महापालिकेने शहरातील विविध भागांत १० ठिकाणी पादचारी पूल उभारले आहेत. मात्र, या पादचारी पुलांचा वापर दिवसातून बोटावर मोजण्याइतकेच नागरिक करत आहेत. या पुलांपैकी विश्रांतवाडी चौकातील आणि कर्वे रस्त्यावरील एसएनडीटी महाविद्यालयाच्या समोरील पादचारी पूल काढून टाकण्यात आले आहेत. उर्वरित आठ ठिकाणीही पुलांचा वापर फारसा होत नाही.
आणखी वाचा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांना केल्या सूचना, म्हणाले…!
बहुतेक पादचारी पूल नऊ ते दहा वर्षांपूर्वी उभारण्यात आले आहेत. या पुलांची देखभाल-दुरुस्ती योग्य पद्धतीने केली जात नसल्याने काही पादचारी पुलांच्या पायऱ्या तुटलेल्या आहेत. लोखंडी ग्रिल खराब झाले असून, काही ठिकाणी तर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दुपारी आणि रात्रीच्या वेळी मद्यपींना हक्काने बसण्याचा अड्डा अशी ओळख पादचारी पुलांची झालेली आहे. त्यामुळे इच्छा असूनही महाविद्यालयीन तरुणी, नोकरदार महिला या पुलांचा वापर करण्यास टाळाटाळ करतात.
काही पादचारी पुलांवर लिफ्ट नादुरुस्त असल्याने ज्येष्ठांना पुलाचा वापर करता येत नाही. सारसबागेतून रस्ता ओलांडून महालक्ष्मी मंदिराकडे जाण्यासाठी महापालिकेने उभारलेला पादचारी पूल कुलूप लावून बंद ठेवण्यात आला आहे. भारती विद्यापीठ परिसरात नागरिकांना रस्ता ओलांडणे सोईचे व्हावे, यासाठी उभारण्यात आलेल्या पादचारी पुलावर सर्रास कचरा टाकलेला असतो. जंगली महाराज रस्त्यावर मेट्रो स्टेशनकडे जाण्याासाठी उभारण्यात आलेल्या पादचारी पुलाचा वापर मोजकेच पादचारी रस्ता ओलांडण्यासाठी करतात. ज्या पुलांवर महिलांना आणि तरुणींना असुरक्षित वाटते, तेथे आवश्यक ती उपाययोजना करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुणे महानगरपालिकेचे प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता युवराज देशमुख म्हणाले, पादचारी नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा, यासाठी महापालिकेने पादचारी उड्डाणपूल बांधले आहेत. मात्र, त्याचा वापर न करता नागरिकांकडून धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडला जातो. ज्या भागात हे पूल आहेत. तेथील क्षेत्रिय कार्यालयाकडे स्वच्छता तसेच त्याची देखभाल करण्याची जबाबदारी दिली आहे. या सर्व पुलांचा आढावा घेऊन आवश्यक ती उपाययोजना केली जाईल.
येथे आहेत पादचारी पूल
- खडकी रेल्वे स्टेशन
- सारसबाग
- भारती विद्यापीठाजवळ
- मृत्यूंजय मंदिर, कर्वेरोड
- सुतार बस स्थानक
- नवा पूल ते मनपा भवन
- आळंदी रस्ता, आरटीओ जवळ
- डेक्कन महाविद्यालय चौक.