पुणे : महापालिकेने लक्ष्मी रस्त्यावर ‘पादचारी दिन’ हा उपक्रम राबविल्याने पादचाऱ्यांना एक दिवसासाठी रस्ते आणि पदपथांंवरून मुक्तपणे संंचार करता आले. या दिनाच्या निमित्ताने पादचाऱ्यांंचा सन्मान करण्यात आला. मात्र, आता पादचाऱ्यांंच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शहरात पादचाऱ्यांना धमकावून त्यांच्याकडील मोबाइल संच, रोकड, दागिने चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. गेल्या अकरा महिन्यांत १६७ घटना घडल्या आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांंची सुरक्षितता वाऱ्यावर असल्याची स्थिती निदर्शनास आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरात नोव्हेंबर महिन्याअखेरपर्यंत पादचाऱ्यांकडील मोबाइल संच, रोकड, तसेच महिलांकडील दागिने चोरून नेण्याच्या १६७ घटना घडल्या. त्यापैकी ७१ गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला. शहरातील मध्य भागाच्या तुलनेत उपनगरात मोबाइल संच, दागिने चोरून नेण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. गजबजलेल्या भागात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांकडील मोबाइल चोरीला जाण्याच्या घटना घडतात. मंडईत भाजी खरेदीसाठी येणाऱ्या नागरिक, महिलांकडील मोबाइल चोरून नेले जातात. खरेदीच्या गडबडीत असलेल्या नागरिकांच्या हे प्रकार त्वरित लक्षात येत नाहीत. शहरातील गर्दीचा भाग, तसेच पीएमपी स्थानक परिसरात पोलिसांनी गस्त वाढविली आहे. अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या चोरट्यांवर पोलिसांनी नजर ठेवली आहे, अशी माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा – राज्यात ‘एसटी’ची सर्वाधिक भ्रमंती कोठे ? कोणी केली सर्वाधिक कमाई ?

पीएमपी स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट

गेल्या दोन-तीन वर्षांपासून पीएमपी प्रवाशांकडील दागिने, रोकड चोरून नेण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. महापालिका भवन, स्वारगेट, हडपसर, पुणे स्टेशन परिसरातील पीएमपी स्थानक परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. शाळा, कार्यालये भरण्याच्या, तसेच सुटण्याच्या वेळांत चोरटे गर्दीच्या मार्गावरील पीएमपी बसमध्ये प्रवेश करुन महिलांकडील दागिने आणि रोकड चोरून नेतात.

पीएमपी बसमधील चोरीच्या घटना

दाखल गुन्हे – उघड गुन्हे

  • दागिने चोरी ३२ – २
  • मोबाइल चोरी ३४ – ११
  • एकुण गुन्हे ६६ – १३ (आकडेवारी नाेव्हेंबर महिनाअखेरपर्यंतची)

महिलांकडील दागिने चोरीच्या घटना

दाखल गुन्हे – उघड गुन्हे

  • दागिने चोरी ८७ – २६
  • मोबाइल चोरी ८० – ४५ (आकडेवारी नोव्हेंबर महिनाअखेरपर्यंतची)

कारागृहातून जामीन मिळवून बाहेर पडलेल्या सराइत चोरट्यांच्या हालचालींवर पोलिसांनी नजर ठेवली आहे. शहरातील प्रत्येक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सराइतांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची चौकशी केली जात आहे. त्यांचे वास्तव्याचे ठिकाण, नातेवाईकांची माहिती संकलित केली जात आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निर्जन रस्त्यांवर नियमित गस्त घालण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत, तसेच दररोज रात्री नाकाबंदी करुन संशयित वाहनचालकांची चौकशी करण्यात येत आहे. – निखील पिंगळे, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा

हेही वाचा – पुणे : विरोध ‘पब’ला नाही; गैरप्रकारांना, पोलीस आयुक्तांचे प्रतिपादन, पबसाठी नियमावली आवश्यकच

पोलिसांच्या सूचना

  • दागिन्यांचे प्रदर्शन करणे टाळावे
  • सार्वजनिक ठिकाणी सतर्क रहावे
  • आजूबाजूला असणाऱ्या संशयितांवर बारकाईने लक्ष ठेवावे
  • रात्रीच्या वेळी निर्जन रस्त्याने प्रवास करणे टाळावे
  • रात्रीच्या वेळी पाठलाग होत असल्यास त्वरित ‘११२’ क्रमांकावर संपर्क साधावा
  • मोबाइल चोरीची तक्रार केंद्र शासनाच्या ‘सीईआयआर’ संकेतस्थळावर नोंदवावी
  • सार्वजनिक ठिकाणी मौल्यवान वस्तुंवर लक्ष ठेवावे
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pedestrian security theft incident pune city pmpl station pune print news rbk 25 ssb