नागरी समस्या अलीकडच्या काळात उग्र रूप धारण करत आहेत. अनेकदा तक्रारी होतात, पण समस्या ‘जैसे थे’ राहते. नागरिकांच्या या समस्यांना प्रातिनिधिक व्यासपीठ देऊन त्यांचे गाऱ्हाणे या व्यासपीठावर मांडणारा ‘लोकसत्ता’चा हा पुढाकार…
पिंपरी-चिंचवड शहरातील महामार्गांसह मुख्य रस्ते प्रशस्त आहेत. हे रस्ते ओलांडण्यासाठी पादचाऱ्यांच्या सोईसाठी पादचारी भुयारी मार्ग महापालिकेने निर्माण केले आहेत. मात्र, सुरक्षेचा अभाव, अस्वच्छता, गैरवर्तन, मद्यपींचा अड्डा असे ग्रहण या मार्गांना लागले आहे. मद्यप्राशन केलेल्या व्यक्ती भुयारी मार्गात झोपलेले असतात. त्यामुळे महिला व विद्यार्थिनींच्या दृष्टिने हे भुयारी मार्ग असुरक्षित होताना दिसत आहेत.
हेही वाचा >>>पुण्यातून ‘अमृत भारत एक्स्प्रेस’ उत्तर भारतातील चार मार्गांवर सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू
महापालिकेने सुरक्षित व सुरळीत वाहतुकीसाठी मुंबई-पुणे महामार्ग प्रशस्त केला आहे. त्याशिवाय, आळंदी-पुणे पालखी मार्ग, निगडी-भोसरी टेल्को रस्ता, औंध-रावेत-किवळे बीआरटी मार्ग, देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग, काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता चिखली बीआरटी हे रस्तेही प्रशस्त झाले आहेत. मुख्य रस्ता, बीआरटी मार्गिका, सेवा रस्ता, सायकल ट्रॅक, पदपथ अशी काही रस्त्यांची रचना आहे. रुंदी व रहदारी अधिक असल्याने थेट रस्ता ओलांडणे पादचाऱ्यांसाठी धोकादायक आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी काही ठिकाणी भुयारी मार्ग निर्माण केले आहेत. मात्र, सोय व सुरक्षेऐवजी गैरसोय आणि असुरक्षितताच अधिक आहे. त्यामुळे पादचारी नागरिक विशेषतः महिला व विद्यार्थिनी हैराण झाल्या आहेत. मद्यपी, अस्वच्छतेमुळे दुर्गंधीचा त्रास प्रत्येक ठिकाणी सहन करावा लागत आहे. याकडे महापालिका व पोलीस प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. सुरक्षारक्षक नेमावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पादचारी भुयारी मार्ग
निगडी गावठाण – भक्तीशक्ती चौक
मुंबई-पुणे महामार्गावर – फुगेवाडी एम मार्टजवळ
चिंचवड स्टेशन पोलीस उपायुक्त कार्यालयाशेजारी
औंध-रावेत बीआरटी मार्गावर – जिल्हा सामान्य रुग्णालयाजवळ
काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता – काळेवाडी डी-मार्ट येथे
आळंदी-पुणे पालखी मार्ग – वडमुखवाडी थोरल्या पादुका मंदिर व साई मंदिराजवळ
कौटुंबिक वादातून महिलेवर चाकूने वार करुन पतीचा आत्महत्येचा प्रयत्न; बाणेर भागातील हाॅटेलमधील घटना
नागरिक काय म्हणताहेत?
ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले, विद्यार्थ्यांना भुयारी मार्गातून जाताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तेथून जाताना भीती वाटते. सुरक्षारक्षक नसतात. मद्यपी झोपलेले असतात. त्यामुळे दिवसाही तेथून जाताना भिती वाटते. मनात भीती कायम असते. रात्री दहानंतर भुयारी मार्गातून जाणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने सुरक्षारक्षक नियुक्त करावेत, अशी मागणी तेजश्री आल्हाट यांनी केली.
पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर निगडी येथील भुयारी मार्गाचे फायदे कमी आणि तोटेच जास्त झाले आहेत. हा भुयारी मार्ग मद्यपींचा अड्डा बनलेला आहे. भुयारी मार्गाच्या जवळच मद्य विक्रीची दुकाने आहेत. त्यामुळे या भुयारी मार्गाचा वापर सामान्य नागरिकांपेक्षा मद्यपीच मोठ्या प्रमाणात करत आहेत. त्यामुळे भुयारी मार्गाचा वापर करणे नकोसे झाल्याचे कुणाल उकिरडे म्हणाले.
प्रशासनाचे म्हणणे काय?
निगडी, काळेवाडीतील भुयारी मार्गात दिवसा सुरक्षारक्षक नियुक्त केले आहेत. विशेषतः मुलांच्या शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळा निश्चित करून सुरक्षारक्षकाचे नियोजन केले आहे. नागरिकांच्या मागणीनुसार सुरक्षारक्षक नियुक्त केले जातील. मद्यपी रात्री तिथे बसत असल्यास पोलिसांकडे तक्रार दिली जाईल. महापालिकेच्या माध्यमातून सुरक्षेच्या दृष्टिने उपाययोजना केली जाईल, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे यांनी सांगितले.
समन्वय : गणेश यादव