चोरट्यांना प्रतिकार करणाऱ्या पादचारी तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन त्याच्याकडील २५ हजारांची रोकड लुटण्यात आल्याची घटना हडपसर भागात घडली.किरण शिंदे (वय ३१, रा. ससाणेनगर, काळेपडळ, हडपसर) असे जखमी झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी तीन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे यांनी या संदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा >>>पुणे: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ४७ लाखांची फसवणूक
शिंदे रात्री साडेनऊच्या सुमारास कामावरुन घरी निघाला होता. ससाणेनगर परिसरात तीन चोरट्यांनी त्याला अडवले. शिंदेला शिवीगाळ करुन चोरट्यांनी त्याला मारहाण केली. शिंदे याच्या खिशातील २५ हजारांची रोकड काढून घेतली. शिंदेने चोरट्यांना प्रतिकार केला.चोरट्यांनी चाकूने शिंदे याच्या कमरेवर वार केले. या घटनेत तो जखमी झाला. पसार झालेल्या चोरट्यांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे तपास करत आहेत.