लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : महापालिकेतून निवृत्त झालेल्या पाच हजार ७२८ निवृत्तिवेतनधारकांना आता हयातीचा दाखला ऑनलाइन सादर करता येणार आहे. निवृत्तिवेतनधारकांच्या अस्तित्वाची पडताळणी, निवृत्तिवेतन त्वरित वितरित करण्याची प्रक्रिया सुलभ आणि वेगवान करण्यासाठी महापालिका पेन्शनर उपयोजन (ॲप) विकसित करणार आहे.
निवृत्तिवेतनधारकांना हयातीचा दाखला, पेन्शनचा दावा करणे सोपे होणार आहे. महापालिका सेवेतून निवृत झालेल्या पाच हजार ७२८ निवृत्तिवेतनधारकांना याचा लाभ मिळणार आहे. त्यांना सरकारी कार्यालयांना प्रत्यक्ष भेट देण्याची गरज राहणार नाही. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची (केवायसी) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महापालिकेत जावे लागणार आहे.
आणखी वाचा-पिंपरीतील यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाईला मुहूर्त मिळेना
निवृत्तिवेतनाचा दावा करणारी व्यक्ती खरोखरच ती स्वत:च आहे का याची व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी ही सुविधा देण्यात आली आहे. हयात प्रमाणपत्र ऑनलाइन सादर करता येणार असल्याने कागदपत्रांची संख्या कमी होणार आहे. यामुळे निवृत्तिवेतनधारकांच्या वेळेची बचत होणार आहे. तसेच त्यांची गैरसोयही टळणार असल्याचे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी सांगितले.