पिंपरी: भाजपच्या हुकूमशाही कारभाराला देशातील जनता कंटाळली असून त्यांचा हा कारभार जास्त दिवस चालणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी केली आहे. तीन सदस्यीय प्रभागरचना झालेली असताना जाणीवपूर्वक चार सदस्यीय प्रभाग करून संभ्रमावस्था निर्माण केली जात आहे . मात्र, राष्ट्रवादीला फरक पडणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
शहर महिला राष्ट्रवादीच्या वतीने मोशीत आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, माजी महापौर मोहिनी लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह डॉ.आशा मिरगे, वैशाली नागवडे, उज्वला शेवाळे, शितल हगवणे, रूपाली दाभाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाल्या, ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही, अशा राज्यांमध्येच ‘ईडी”च्या माध्यमातून कारवाई केली जात आहे. काहीही करून विरोधकांना तरूंगात टाकायचे. भाजपच्या विरोधात आंदोलने, मोर्चे करायचे नाहीत, असे दबावाचे राजकारण सध्या सुरू आहे. हे जास्त दिवस टिकणार नाही. कविता आल्हाट म्हणाल्या, पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी १०० सदस्यांचा आकडा ओलांडणार आहे. महागाई, बेरोजगारीमुळे जनतेत आक्रोश आहे. मतदानाच्या माध्यमातून जनता त्यांचा संताप दाखवून देईल.