प्रथमेश गोडबोले, लोकसत्ता

पुणे : चालू आर्थिक वर्षात (सन २०२३-२४) पहिल्या सहामाहीत केवळ पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधून तब्बल चार हजार कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यांच्या घेतलेल्या आढाव्यात ही बाब समोर आली आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडकरांचा मालमत्ता खरेदी-विक्रीकडे कल असल्याचे दिसून आले आहे.

पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो प्रकल्प, दोन वर्तुळाकार रस्ते अशा महत्वाकांक्षी प्रकल्पांसह माहिती व तंत्रज्ञान क्षेत्र, उद्योग, रोजगाराची हमी अशा विविध घटकांमुळे पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये मालमत्ता खरेदी-विक्रीत वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने नोंदविले आहे. चालू आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२३ ते सप्टेंबर अखेरीस पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल एक लाख ४३ हजार २८६ दस्त नोंद झाले आहेत. त्यातून चार हजार ३३ कोटी ४९ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. चालू आर्थिक वर्षात पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसाठी राज्य शासनाने ८५०० कोटी रुपयांच्या महसूलाचे उद्दिष्ट दिले आहे. या उद्दिष्टापैकी निम्मे उद्दिष्ट पहिल्या सहामाहीत पूर्ण करण्यात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला यश आले आहे.

आणखी वाचा-पीएमपीच्या कर्मचाऱ्यांचीही दिवाळी गोड

दरम्यान, राज्यात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहेत. त्यामध्ये रस्ते, सिंचन प्रकल्प, विमानतळ, मेट्रो आदींबरोबर विविध विकास कामांचा समावेश आहे. या कामांसाठी शासनाला मोठय़ा प्रमाणावर निधीची आवश्यकता असते. शासनाकडे जमा होणारा हा महसूल विविध विकास कामांवर खर्च केला जातो. जमा होणाऱ्या महसुलाच्या आकडेवारीवरूनच कोणत्या कामांसाठी किती निधी उपलब्ध करून द्यायचा, याचा निर्णय होत असतो. त्यामुळे नोंदणी विभागाकडे जमा होणाऱ्या महसुलाकडे शासनाचे लक्ष असते.

पुणे आघाडीवर

राज्याला महसूल मिळवून देण्यात वस्तू व सेवा करानंतर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा क्रमांक लागतो. जमीन, सदनिका, दुकाने आदींची खरेदी-विक्री, दोन व्यक्ती किंवा संस्थांमध्ये होणारे करार, बक्षीसपत्र, ऑनलाइन भाडेकरार अशा विविध दस्तांची नोंदणी करताना मुद्रांक शुल्क भरावे लागते. मुद्रांक शुल्कातून नोंदणी विभागाला हा महसूल मिळाला आहे. राज्यामध्ये शहरीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. शहरांच्या हद्दीलगतच्या गावांमध्येही मोठ्या प्रमाणावर सदनिका खरेदी-विक्रीचे व्यवहार होत आहेत. त्यामध्ये राज्यात पुणे आघाडीवर आहे.

आणखी वाचा-‘पीडीसीसी’ बँकेच्या माध्यमातून पार्थ पवारांचा सक्रिय राजकारणात प्रवेश?

पहिल्या सहामाहीचा आढावा

महिना दस्त संख्यामहसूल
एप्रिल २२,९९२४४९.५४
मे २३,२५५६११.७३
जून २३,३४२६७४.०४
जुलै२५,२२९७१२.३३
ऑगस्ट२५,०६५ ७८३.९५
सप्टेंबर२३,४०३८०१.९०
एकूण१,४३,२८६४०३३.४९

गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढलेले दस्त आणि वाढीव महसूल

महिना वाढीव दस्त संख्यामहसूल
एप्रिल१८७२२३८.६१
मे१५६४१६६.६६
जून६०११५५.५८
जुलै४२१२१०६.८
ऑगस्ट५३५० १७४.३४
सप्टेंबर१९१३ २०६.९१
एकूण१५,५१२ १०४८.९

Story img Loader