पुणे : महापालिकेच्या हद्दीत नव्याने समावेश झालेल्या खडकवासला, किरकिटवाडी, नांदोशी या भागात ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’चे संशयित रुग्ण आढळून येत आहेत. या भागातील नागरिकांना ज्या विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो, त्या विहिरीच्या पाण्यात दूषित पाणी मिसळले जात आहे का, याचा शोध घेण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीमध्ये काही तरी झिरपत असल्याची माहिती पुढे येत आहे. याचा त्यामुळे हे नक्की काय आहे, याचा शोध घेण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. या भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेकडे स्वतंत्र यंत्रणा नाही. ही गावे महापालिकेच्या हद्दीत येण्यापूर्वी पाणीपुरवठा करण्याची जी व्यवस्था होती, त्याच पद्धतीने आताही महापाालिकेच्या वतीने पाणीपुरवठा केला जात आहे. या समाविष्ट गावातील नागरिकांना शुद्धीकरण केलेले पिण्याचे पाणी महापालिकेच्या वतीने देण्यात येत नाही.

खडकवासला धरण क्षेत्राच्या परिसरात अनेक हॉटेल्स, रो-हाउस झाली आहेत. त्यांचे सांडपाणी थेट धरणात सोडले जात असल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. महापालिका या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत धरणाचे पाणी उचलून सोडते. हे करताना त्यावर कोणतीही प्रक्रिया करण्याची व्यवस्था महापालिकेकडे नाही. खबरदारी म्हणून ‘ब्लीचिंग पावडर’ विहिरीत टाकली जाते. या भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करताना आजूबाजूचे सांडपाणी या पिण्याच्या पाण्यात मिसळण्याची शक्यता असते. त्यामुळेदेखील नागरिकांना त्रास होऊ शकतो, असा अंदाज महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

‘या भागातील नागरिकांच्या घरातील पाण्याचे नमुने, विहिरीतील आणि धरणातील पाण्याचे नमुने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तपासण्याासाठी प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. त्याचा अहवाल अद्याप आला नाही. हा अहवाल आल्यानंतर रुग्णांची संख्या नक्की कशामुळे वाढत आहे, याचे कारण स्पष्ट होईल,’ असे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.

अतिरिक्त आयुक्तांकडून आज विहिरीची पाहणी

महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावातील नागरिकांना महापालिकेच्या वतीने विहिरीतून पाणी पुरवठा केला जातो त्या विहिरीची पाहणी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी हे करणार आहेत. गुरुवारी (२३ जानेवारीला) अतिरिक्त आयुक्त आणि महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी या भागात जाणार आहेत. महापालिकेच्या वतीने या भागातील नागरिकांना केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याची संपूर्ण माहिती घेतली जाणार आहे. तसेच, आजूबाजूच्या भागाची पाहणी करून पाणी दूषित होत असेल, तर त्यामागील कारणांचा तपासदेखील केला जाणार आहे. विहिरीमध्ये काही तरी झिरपत असल्याचे लक्षात आले आहे. हे नक्की काय आहे, याचा शोध घेतला जात असल्याचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज यांनी सांगितले.

ज्या भागात रुग्णांची संख्या वाढत आहे. तेथील नागरिकांनी पाणी उकळून आणि गाळून प्यावे, अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत. या विहिरीच्या आजूबाजूच्या सांडपाणी वाहिन्यांची स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. पाण्याचे नमुने तपासण्यासाठी देण्यात आले असून, त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही, असे मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People of khadakwasla kirkatwadi getting water without purification pune health department on alert mode background of guillain barre syndrome pune print news ccm asj